

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत महायुतीचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आल्याने सत्ता स्थापन करण्याचा दावा करण्यात आला आहे. बुधवारी महायुतीतील पक्षांची विभागीय आयुक्त कार्यालयात स्वतंत्रपणे अधिकृत नोंदणी करण्यात आली.
यापूर्वी भाजपकडून मुरलीधर जाधव, शिवसेनेकडून शारंगधर देशमुख तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून आदिल फरास यांची गटनेतेपदी निवड झाल्याचे अधिकृत पत्र विभागीय आयुक्तांना सादर करण्यात आले. महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक 6 फेब्रुवारी रोजी होणार असून 2 फेब्रुवारीला उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. त्यामुळे येत्या दोन दिवसांत महापौर-उपमहापौरपदाच्या राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे. कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसचे 34, भाजपचे 26, शिवसेनेचे 15, राष्ट्रवादी काँग्रेसचे 4, उद्धव ठाकरे शिवसेनेचा 1 व जनसुराज्य शक्ती पक्षाचा 1 असे नगरसेवक निवडून आले आहेत. सर्वाधिक 34 नगरसेवक असूनही काँग्रेसकडे स्पष्ट बहुमत नाही.
भाजपने शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेससोबत महायुती करून निवडणूक लढविली असल्याने महायुतीकडे बहुमत असून महापौर व उपमहापौर ही दोन्हीही पदे या घटक पक्षांत वाटून घेतली जाणार आहेत. भाजपच्या नगरसेवकांची नोंदणी करण्यासाठी गटनेते मुरलीधर जाधव यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवक व नगरसेविका पुणे येथे गेले होते. यावेळी महानगर जिल्हाध्यक्ष विजय देसाई, रुपाराणी निकम, विजयसिंह खाडे-पाटील, निलिमा पाटील आदी उपस्थित होते.
महायुतीचा सत्तावाटपाचा फॉर्म्युला अद्याप निश्चित नाही
महायुतीने सत्तावाटपाचा अंतिम फॉर्म्युला अद्याप निश्चित केलेला नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे पुढील दोन दिवस चर्चा होऊ शकणार नाही. त्यामुळे शनिवार (दि. 31) किंवा 1 फेब्रुवारीपर्यंत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. 2 फेब—ुवारीला उमेदवारी अर्ज दाखल करायचे असल्याने त्यापूर्वी सत्तावाटपाचा फॉर्म्युला निश्चित केला जाणार आहे.
महापौरपदासाठी इच्छुकांची फिल्डिंग
महापौर पदासाठी भाजपाकडून रुपाराणी निकम, विजयसिंह खाडे-पाटील, प्रमोद देसाई, विजय देसाई, वैभव कुंभार व सुरेखा ओवटकर यांच्या नावांची चर्चा सुरू आहे. यापैकी एकाला संधी मिळण्याची शक्यता असून त्याद़ृष्टीने इच्छुकांनी फिल्डिंग लावली आहे. उपमहापौर पद शिवसेनेकडे जाण्याची शक्यता असून, त्याबाबत शनिवारी किंवा रविवारी अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.