

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेसाठी महायुतीच्या सत्तेच्या फॉर्म्युल्यावर अखेर शनिवारी (दि. 31) शिक्कामोर्तब करण्यात आले. येत्या पाच वर्षांत 10-10 महिन्यांचे सहा महापौर करण्यावर नेतेमंडळींचे एकमत झाले. महापौरपदाचा पहिला मान भाजपला मिळणार आहे. दुसर्या वर्षी शिवसेनेचा महापौर केला जाणार आहे. असे दरवर्षी रोटेशन पद्धतीने महापौरपद भाजप व शिवसेनेला मिळणार आहे. रविवारी (दि. 1) महायुतीचे नेते सत्तेच्या सर्व पदांच्या फॉर्म्युल्याचे गुपित उघड करणार आहेत.
शहरातील कावळा नाका येथील एका हॉटेलमध्ये महायुतीच्या नेत्यांची बैठक झाली. भाजपचे नेते, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, शिवसेनेचे नेते व राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, भाजपचे खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव, प्रदेश सचिव महेश जाधव, शिवसेनेचे नगरसेवक शारंगधर देशमुख आदी उपस्थित होते. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ मुंबईला गेल्याने बैठकीला उपस्थित नव्हते. त्यामुळे रविवारी त्यांच्या उपस्थितीत महायुतीच्या सत्तावाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला जाणार आहे. दरम्यान, जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनीही मंत्री चंद्रकांत पाटील, आ. क्षीरसागर यांच्याशी चर्चा करून निवडप्रक्रियेत भाग घेतला.
बैठकीत नेत्यांत पाच वर्षांत किती महापौर करावे याविषयी चर्चा झाली. त्यात पाच वर्षांत 4, 5 किंवा 6 करावे यावर विचारविनिमय झाला. अखेर जास्तीत जास्त नगरसेवकांना संधी देण्यासाठी 10 महिन्याला एक असे 6 महापौर करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यानुसार पाच वर्षांत प्रत्येकी 10 महिन्यांचे सहा महापौर केले जाणार आहेत. यात भाजपला 3 आणि शिवसेनेला 3 महापौरपद मिळणार आहेत. भाजपचा पहिला महापौर झाल्यानंतर दुसरा शिवसेनेचा अशा पद्धतीने महापौरपद दिले जाणार आहे.
उपमहापौरपद मात्र भाजपला 2, शिवसेनेला 2 आणि राष्ट्रवादीला 1 देण्यात येणार आहे. सत्तेत सहभागी होणार्या जनसुराज्य शक्ती पक्षालाही 1 उपमहापौरपद दिले जाणार आहे. स्थायी समिती सभापतिपद भाजपला 3, शिवसेनेला 2 वर्षे असा फॉर्म्युला निश्चित होण्याची शक्यता आहे. त्याबरोबरच परिवहन समिती सभापतिपद राष्ट्रवादीला दिले जाणार आहे. महिला व बालकल्याण समिती आणि शिक्षण मंडळ समितीबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली.