

चंद्रशेखर माताडे
कोल्हापूर : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत, तर उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात बोलताना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणूनच लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे गेले काही दिवस महायुती म्हणून लढणे अवघड, काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होणार या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. यातील संदिग्धता या वक्तव्याने दूर झाली आहे; मात्र महायुतीतील घटकपक्षांतून उमेदवारीच्या अपेक्षेने जे घाऊक पक्षप्रवेश झाले आहेत त्या सर्वांना सामावून घेताना इच्छुकांची नाराजी दूर करण्याचे आव्हान महायुतीतील नेत्यांसमोर आहे.
राज्यातील सत्तांतरानंतर जिल्ह्यातही गोकुळ या बलाढ्य आर्थिक गडात सत्तांतर झाले. नेते तेच पण त्यांनी पक्ष बदलल्याने महायुतीच्या ताब्यात हा गड आपसूकपणे आला. महायुतीमध्ये प्रवेशासाठी नेत्यांची स्पर्धा सुरू झाली. मग, मागे राहतील ते कार्यकर्ते कसले? कार्यकर्त्यांमध्ये प्रवेशाची स्पर्धा सुरू झाली. माजी नगरसेवकांना महत्त्व आले. महायुतीमध्ये प्रवेश करताना उमेदवारीची हमखास खात्री मिळवूनच कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. आपापल्या नेत्यांमार्फत त्यांनी वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधताना महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका, नगरपंचायतीत आपल्याला उमेदवारी मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली. अपेक्षा व्यक्त करणारे एकटेच नाहीत. तेथेही उमेदवारीसाठी प्रचंड स्पर्धा आहे. या स्पर्धेत इलेक्टीव्ह मेरिट म्हणजे निवडून येण्याची क्षमता या एकमेव निकषावर उमेदवारी निश्चित होणार आहे. या निकषात कितीजण बसतात, ते पाहूनच निर्णय होणार आहे.
ज्यांना उमेदवारी मिळणार नाही ते नाराज होणार हे स्पष्ट आहे. हे अपेक्षाभंगाचे दुःख ते अन्यत्र जाऊन दूर करण्याचा प्रयत्न करणार, हे नक्की! सध्या तरी अन्यत्र म्हणजे महाविकास आघाडीचा पर्याय त्यांच्यासमोर असू शकतो. मुळात महायुतीत तीन घटक पक्ष. या घटक पक्षांचे पुन्हा मित्र पक्ष असा सगळा मामला आहे. घटक पक्षांचेही जागा वाटप निश्चित होणार. त्यातून कोणाला किती जागा मिळणा, हे स्पष्ट होणार आहे. त्यानंतर उमेदवारी असा सगळा मामला आहे.
मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत बोलताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महायुती म्हणून एकत्र लढणार असल्याची भूमिका पत्रकार परिषदेत मांडली. कोल्हापुरात उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीच म्हणून लढणार असे स्पष्ट केले. महायुतीतील दोन मोठ्या घटक पक्षांच्या नेत्यांनी ही भूमिका घेतल्याने मैत्रीपूर्ण लढतीसह अन्य सर्व पर्याय संपुष्टात आले आहेत. आता महायुती म्हणून लढण्याचे ठरल्यानंतर नाराजी, कुरबुरी, अपेक्षाभंग हे सारे असणारच; मात्र ही नाराजीची फौज थोपविण्याचे सर्वात मोठे आव्हान महायुतीच्या नेत्यांसमोर असेल.
भाजप, शिंदे शिवसेना, अजित पवार राष्ट्रवादी, जनसुराज्य शक्ती, यड्रावकर यांची राजर्षी शाहू आघाडी व अन्य मित्र पक्षांत जागा वाटपाचे आव्हान मोठे आहे. कोल्हापूर महापालिकेचे उदाहरण पाहायचे झाले, तर 81 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. भाजपने आता 32 जागांची मागणी केली आहे. हे पाहता जागा वाटपाचे गणित किती अवघड आहे, हे लक्षात येते. यामध्ये पक्षाचे बलाबल आणि त्या मतदारसंघातील लोकप्रतिनिधी यांचाही विचार करावा लागणार आहे. येथे नेत्यांची कसोटी लागणार आहे.