

विकास कांबळे
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीने सत्ता मिळविली असली, तरी शहरातील राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू मात्र एकाकी झुंज देणारे काँग्रेसचे आमदार सतेज पाटील हेच ठरले. निकालानंतर सत्तास्थापनाच्या गणितांपेक्षा सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने दाखवलेला लढाऊ बाणा, कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यात आलेले यश आणि घेतलेली स्वतंत्र राजकीय भूमिका शहरभर चर्चेचा विषय बनली आहे.
राज्यातील सत्तांतरानंतर राजकीय आघाड्यांची समिकरणे बदलली. कोल्हापूर जिल्हादेखील त्याला अपवाद राहिला नाही. जिल्ह्याच्या राजकारणावरही परिणाम झाला. त्यामुळे महापालिकेच्या राजकारणात एकत्र निर्णय घेणार्या या त्रिमूर्ती वेगवेगळ्या दिशेने उभ्या ठाकल्या. मंत्री मुश्रीफ यांना महायुतीसोबत राहण्याशिवाय पर्याय उरला नाही. तर आमदार डॉ. विनय कोरे यांनी स्वतंत्र राजकीय भूमिका घेतली. या बदललेल्या परिस्थितीत आमदार पाटील यांनी आघाडी म्हणून थेट मैदानाचा उतरण्याचा निर्णय घेतला. परंतु शरद पवार राष्ट्रवादीनेही त्यांची साथ सोडली. त्यामुळे सतेज पाटील यांनी काँग्रेसची धुरा एकहाती सांभाळत निवडणूक लढविण्याचे ठरविले. ही लढाई केवळ जागांसाठी नव्हती, तर कोल्हापूरच्या राजकारणात स्वतंत्र अस्तित्व टिकवण्याची होती. त्यामुळे आमदार पाटील यांनी परफेक्ट निवडणूक नियोजन निवडणुकीत तत्काळ राबविले. त्यांचे वैशिष्ट्य असलेल्या एखाद्या टॅगलाईननुसार ‘कोल्हापूर कस्सं...’ ही टॅगलाईन घेऊन ते रात्री उशिरापर्यंत पायाला भिंगरी बांधून शहर पिंजून काढू लागले आणि मनपात 35 जागा मिळविल्या.
काँग्रेसने जागावाटप, जाहीरनामा प्रसिद्ध करणे या सर्वांतच आघाडी घेतली होती. सर्वप्रथम उमेदवारांची पहिली यादी काँग्रेसने जाहीर केली. त्यानंतर प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात महिलांना व विद्यार्थ्यांना मोफत केएमटी प्रवास सवलत योजनेमुळेही काँग्रेसला लाभ झाली.
मनपात महायुतीची सत्ता आली असली तरी काँग्रेस संपली किंवा काँग्रेस निष्प्रभ झाली म्हणणार्यांना आ. सतेज पाटील यांनी चपराक दिली. महाविकास आघाडी एकत्र लढणार असल्याचे जाहीर होते. परंतु जागावाटपात एकमत न होऊ शकल्यामुळे शरद पवार राष्ट्रवादी आघाडीतून बाहेर पडली. शिवसेना ठाकरे गटही बाहेर पडण्याच्या मार्गावर होता. पण आ. पाटील यांनी काही जागांवर तडजोड केली. पण त्यांना खर्या अर्थाने एकट्यानेच लढावे लागले.
काँग्रेसची धुरा एकहाती सांभाळत गाजवले निवडणुकीचे मैदान
महापालिकेतील सत्तेपेक्षा राजकारणात स्वतंत्र अस्तित्व टिकवण्याची यशस्वी लढाई
‘कोल्हापूर कसं...’ आणखी एका यशस्वी टॅगलाईनचा शहरात बोलबाला
प्रचंड साधनसामग्रीची महायुती असतानाही आक्रमक प्रचार अन्
थेट संपर्क ठेवल्यामुळे यश
एकटे लढण्याच्या भूमिकेची मिळाली सहानुभूती; निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात मिळाला लाभ
कोल्हापुरातील काँग्रेस संपली, निष्प्रभ झाली, हा विरोधकांचा दावा आ. सतेज पाटील यांनी ठरविला खोटा
सर्वाधिक 35 जागा जिंकून निवडणूक निकालांत राज्यातील वरिष्ठ नेत्यांचे वेधले लक्ष
मार्मिक टॅगलाईनभोवती संपूर्ण संघटना गतिमान करण्याच्या वैशिष्ट्यांनी आमदार पाटील ठरले युवकांच्यात ‘आयडॉल’