Maharashtra Water Crisis | चिंताजनक... राज्यातील धरणांमध्ये केवळ ५५ टक्के पाणीसाठा

४,१७२ गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा : भविष्यात भीषण पाणीटंचाईचे संकेत; १९ धरणे पडली कोरडीठाक
Maharashtra Water Crisis |
Maharashtra Water Crisis | चिंताजनक... राज्यातील धरणांमध्ये केवळ ५५ टक्के पाणीसाठा
Published on: 
Updated on: 

सुनील कदम

कोल्हापूर : राज्यातील लहान-मोठ्या सर्व धरणांमध्ये मिळून सध्या केवळ ५५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. राज्यभरातील ४,१७२ गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे, तर १९ धरणे कोरडीठाक पडली आहेत. यातून आगामी काळात राज्याला भीषण पाणी टंचाईला तोंड द्यावे लागण्याचे संकेत मिळत आहेत..

राज्यापुढे मोठे आव्हान!

राज्यातील सर्व ३०४२ धरणांची मिळून एकूण पाणी साठवण क्षमता १७२२ टीएमसी इतकी आहे. पण यंदा पावसाने ओढ दिल्यामुळे पावसाळ्यात धरणांमध्ये १३६९ टीएमसी म्हणजे केवळ ७९ टक्के इतकाच पाणीसाठा झाला होता. पावसाळा संपल्यानंतर आता त्या पाणी साठ्यातही मोठी घट होऊन सध्या फक्त ९६३.७० टीएमसी इतका म्हणजे ५५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ९० टक्के पाणीसाठा शिल्लक होता. यंदाचे दोन महिने आणि पुढील वर्षाचे सुमारे साडेचार महिने असे जवळपास साडेसहा महिने शिल्लक पाणीसाठा पुरवून वापरण्याचे आव्हान राज्यापुढे आहे.

शिल्लक पाणीसाठा!

राज्यातील अमरावती विभागात सध्या सर्वात कमी म्हणजे केवळ ७७ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. नागपूर विभागात ९८ टीएमसी, छ. संभाजीनगर विभागात १०१, नाशिक विभागात १५९, पुणे विभागात ४१८ आणि कोकण विभागात १०८ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. विशेष म्हणजे सर्वात कमी पाणीसाठा असलेल्या अमरावती आणि नागपूर विभागात अजूनही टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्याची वेळ आलेली नाही. पण सर्वाधिक पाणीसाठा शिल्लक असलेल्या पुणे आणि नाशिक विभागात मात्र राज्यातील सर्वात जास्त टँकर सुरू असल्याचे दिसत आहे. कोकणातही अद्याप टँकर सुरू करावे लागलेले नाहीत. एकूणच राज्याचा विचार करता धरणांमध्ये शिल्लक असलेला जेमतेम पाणीसाठा, राज्यभरातून होत असलेली टँकरची मागणी आणि उन्हाळ्याची तीव्रता विचारात घेता यंदा राज्याला पाणी टंचाईच्या तीव्र झळा सोसाव्या लागण्याची चिन्हे दिसत आहेत.

कोरडीठाक पडलेली धरणे!

खडकपूर्णा, बोरगाव-अंजनपूर, डोंगरगाव, रोशनपुरी, सिरसमार्ग, वांगदरी (बीड), गुंजारगा, किल्लारी, लिंबाळा, मदनसुरी, राजेगाव, सिना कोळेगाव, तागरखेडा (धाराशिव), बिडगीहाळ, कारसा पोहरेगाव, नागझरी, शिवनी (लातूर) ही १९ धरणे आजअखेर कोरडीच आहेत. कोरडेठाक पडलेले बहुतांश प्रकल्प मराठवाडा विभागातील असल्याने यंदा त्या भागाला पाणी तीव्र टंचाईचा सामना करावा लागण्याची चिन्हे दिसत आहेत.

टँकरची वाढती मागणी!

राज्यात आजघडीला ९०४ गावे आणि ३२६८ वाड्या-वस्त्या अशा ४१७२ गावांमध्ये ११०१ टँकरमधून पाणीपुरवठा सुरू आहे. दररोज शेकडो गावांमधून टँकरची मागणी वाढताना दिसत आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षी या दिवसात राज्यातील एकाही गावामध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आलेली नव्हती. अमरावती आणि नागपूर वगळता राज्यातील अन्य चार विभागांमध्ये सध्या टँकर सुरू आहेत. पण उन्हाळ्याची तीव्रता विचारात घेता लवकरच राज्यभरातच टँकरची मागणी वाढण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.