

कोल्हापूर : महाराष्ट्रातील भूजलसाठ्याची स्थिती दिवसेंदिवस चिंताजनक बनत आहे. राज्यातील बहुतांश भागांमध्ये भूजल पातळीत मोठी घट नोंदविली गेली असून, त्याचा थेट परिणाम आगामी काळातील पाणीपुरवठ्यावर होण्याची शक्यता आहे. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने केलेल्या निरीक्षणानुसार, राज्यातील एकूण ३ हजार ८१६ निरीक्षण विहिरींपैकी तब्बल ३ हजार ३२१ विहिरींमध्ये भूजल पातळी खालावली आहे. म्हणजेच, राज्यातील सुमारे ८७ टक्के निरीक्षण विहिरींमधील पाणी पातळीत घट झाली आहे. विशेष म्हणजे, यापैकी ९६४ विहिरींमध्ये तीन मीटरपेक्षा अधिक घट नोंदविण्यात आली असून, त्यामुळे राज्यातील भूजलसाठ्यावरील ताण वाढला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील स्थितीही गंभीर असून, राज्यात तिसऱ्या क्रमांकावर या विभागाची नोंद झाली आहे.
भूजलसाठ्यावरील वाढता ताण चिंतेचा विषय
भूजल पातळीत घट होण्यामागे पावसाचे असमान वितरण, भूजलाचा अतिउपसा, पावसाचे पाणी जमिनीत मुरण्याचे कमी होत चाललेले प्रमाण आणि बदलती पीक पद्धती यासारखे घटक कारणीभूत ठरू शकतात. वाढते नागरीकरण, बांधकामे आणि नैसर्गिक जलपुनर्भरणाच्या क्षेत्रांमध्ये होणारे बदल यांचाही भूजलसाठ्यावर परिणाम होताना दिसत आहे.
• ३ मीटरपेक्षा अधिक घट : ९६४ विहिरींमध्ये (२९ टक्के) पाणी पातळी
३ मीटरपेक्षा जास्त खाली गेली. या भागांत ऑक्टोबरपासूनच पाणीटंचाईच्या झळा जाणवत आहेत.
• २ ते ३ मीटर घट : ४९१ विहिरींमध्ये (१४.७ टक्के) घट नोंदवली गेली. या भागांत जानेवारीपासून तीव्र टंचाई भासण्याची शक्यता आहे.
• १ ते २ मीटर घट : ८३४ विहिरींमध्ये (२५.१ टक्के) मध्यम स्वरूपाची घट झाली असून, येथे मार्च २०२७ पासून टंचाई जाणवू शकते.
• ० ते १ मीटर घट : १,०३२ विहिरींमध्ये (३१ टक्के) किरकोळ घट नोंदवण्यात आली.