

राशिवडे : संपूर्ण जगामध्ये चालू गळीत हंगामामध्ये 1860 लाख टन साखर उत्पादन झाले असून त्यामध्ये ब्राझीलने 450 लाख टन साखर उत्पादित करून पहिला क्रमांक मिळविला तर पाठोपाठ 340 लाख टन साखर उत्पादित करून भारत दुसर्या क्रमांकावर राहिला आहे. देशात महाराष्ट्र राज्य साखर उत्पादनामध्ये अव्वल राहिले आहे.
संपूर्ण जगामध्ये गतगाळप हंगामामध्ये मिळून 1860 लाख टन साखर उत्पादन झाले असून त्यामध्ये ब्राझीलने 450 लाख टन साखर उत्पादन करून अग्रक्रम मिळविला आहे; तर भारताचा दुसरा क्रमांक लागत असून 340 लाख टन साखर उत्पादन झाले आहे. त्यापैकी महाराष्ट्र, उत्तर प्रदेश व कर्नाटक या राज्यांमध्ये 85 टक्के साखर उत्पादन झाले आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक 107 लाख टन साखर उत्पादन झाले आहे. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, कर्नाटक, तामिळनाडू, मध्य प्रदेश, गुजरात, पंजाब, बिहार, हरियाणा, आंध्र प्रदेश, तेलंगणा या राज्यांनी गाळप हंगाम घेतला. महाराष्ट्र 107 लाख टन, उत्तर प्रदेश 104 लाख टन, कर्नाटक 54 लाख टन, तामिळनाडू 14.75 लाख टन व गुजरात 9.20 लाख टन याप्रमाणे साखर उत्पादन झाले. देशामध्ये 534 कारखान्यांनी गाळप हंगाम घेतले. महाराष्ट्राचा सुरुवातीला 90 लाख टन साखर उत्पादनाचा प्राथमिक अंदाज होता; परंतु उशिरा सुरू झालेला हंगाम प्रत्यक्षात 130 दिवसांपेक्षा जास्त दिवस चालला. हंगामामध्ये 107 लाख टन साखर उत्पादन झाले. हे उत्पादन मागील हंगामात 105 लाख टन होते. राज्याचा सरासरी साखर उतारा 10.26 टक्के असून मागील हंगामात तो 9.98 टक्के होता. यावर्षी 207 साखर कारखान्यांनी गाळप हंगाम घेतले. त्यापैकी 103 सहकारी व 104 खासगी साखर कारखाने आहेत. साखर उत्पादनामध्ये महाराष्ट्राला पहिला क्रमांक मिळाला असून उत्तर प्रदेशसारख्या राज्याला मागे टाकले आहे; तर पश्चिम महाराष्ट्रातील कारखान्यांनी नंबर वन ठरण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
देशामध्ये साखर उत्पादनामध्ये महाराष्ट्र राज्यास अग्रक्रमावर ठेवण्यामध्ये राज्यातील सर्वच कारखान्यांचा विशेषत: पश्चिम महाराष्ट्रातील कारखान्याचा मोठा हातभार आहे. परंतु सरकारच्या कुचकामी धोरणामुळे साखर उत्पादनामध्ये नंबरवर असणारे सहकारी कारखाने अर्थिक अडचणीत आहेत. याच कारखान्यांना सरकारच्या अर्थिक मदतीची सध्या गरज आहे.