

आशिष शिंदे
कोल्हापूर : एकेकाळी कुंपण, टोपल्या, सुपे किंवा घराच्या बांधकामापुरता मर्यादित असलेला बांबू आता टूथब्रश, कंगवा, फर्निचर, बाटल्या, दागिने, योगा मॅट, कापड आणि कपड्यांपर्यंत पोहोचला आहे. महाराष्ट्रात तब्बल १३,५७२ चौ. किमी क्षेत्रावर विस्तारलेले बांबू लागवड क्षेत्र देशात तिसऱ्या क्रमांकावर आहे. देशातील बांबू व कॅन (वेत/रॅटन) उद्योगाची उलाढाल २८ हजार कोटी रुपयांवर गेली आहे.
राज्याची अंदाजित वार्षिक बांबू उत्पादन क्षमता १५७.१२ लाख टन आहे. पर्यावरणपूरक आणि नूतनीकरणक्षम पर्यायांकडे ग्राहकांचा कल वाढत असताना बांबूच्या पारंपरिक वापराला आधुनिक उत्पादनांची जोड मिळाली आहे. त्यामुळे ‘बांबू’ आता केवळ जंगलातील वनस्पती न राहता ‘ग्रीन गोल्ड’ म्हणून अर्थव्यवस्थेतील नव्या संधींचे माध्यम बनत आहे.
भारतात तब्बल १.३९६ कोटी हेक्टर क्षेत्रावर बांबू लागवड असून १३६ प्रजातींच्या विविधतेसह भारताचा बांबू क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात आघाडीवर आहे. महाराष्ट्राने आता बांबूला केवळ शेतीपूरक पीक न मानता उद्योगाचे स्वरूप देण्याच्या दिशेने पावले टाकली आहेत. बांबू उद्योग धोरणांतर्गत राज्यातील बांबू लागवड आणि प्रक्रिया क्षमता असलेल्या १३ भागांमध्ये १५ बांबू क्लस्टर उभारण्याचे प्रस्तावित आहे. या क्लस्टरमध्ये कागद, फर्निचर, बांधकाम साहित्य, कापड, जैवइंधन, हस्तकला आदी उद्योगांना चालना दिली जाणार आहे. या क्षेत्रात ५० हजार कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक आकर्षित करण्याबरोबरच पाच लाख प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगारनिर्मितीचे राज्याचे लक्ष्य आहे. यासाठी २०२५ ते २०३० या पाच वर्षांच्या धोरण कालावधीत सुमारे १,५३४ कोटींची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.
अशी तयार होतात बांबूपासून उत्पादने
बांबू म्हणजे फक्त काठी नव्हे, तर दैनंदिन जीवनातील वस्तूंचा ‘ग्रीन मटेरियल’ बनला आहे. बांबूच्या काड्या प्रक्रिया करून त्यापासून लगदा, तंतू आणि बोर्ड तयार केले जातात. त्यातून टूथब्रशचे हँडल, कंगवे, फर्निचर, बाटल्या, दागिने, योगा मॅट यांसारख्या वस्तूंना आकार मिळतो. तर बांबूच्या तंतूंपासून धागा तयार करून त्याचे कापड विणले जाते आणि त्यातून शर्ट, टी शर्ट, सॉक्स यांसारखी वस्त्रे तयार होतात. विशेषतः बांबूचे सॉक्स पायांसाठी मऊ, हलके आणि ओलावा शोषून घेणारे असल्याने त्यांना पसंती मिळते त्यामुळे घाम आणि अस्वस्थता कमी जाणवण्यास मदत होते.
दृष्टिक्षेपात बांबू उद्योग
१५७.१२ लाख
टन इतकी वार्षिक बांबू उत्पादन क्षमता
५० हजार कोटींची गुंतवणूक
५ लाख रोजगारांचे लक्ष्य
१३,५७२ चौ. किमी
क्षेत्रावर महाराष्ट्रात बांबू लागवड
१,५३४ कोटींची
आर्थिक तरतूद रोजगार निर्मितीसाठी