

बिरू व्हसपटे
शिरढोण : घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची असतानाही जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर शिरढोण येथील सृष्टी सुनील गुरव हिने दहावीच्या परीक्षेत ९८ टक्के गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
सृष्टीचे कुटुंब एका छोट्याशा दहा बाय दहा खोलीत राहते. वडील सुनील गुरव गेली ३५ वर्षे दुसऱ्याच्या किराणा दुकानात रोजंदारीवर काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. तर आई मोलमजुरी करून संसाराला हातभार लावतात. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही सृष्टीने अभ्यासावर लक्ष केंद्रित ठेवत हे घवघवीत यश मिळवले.
सृष्टी ही शिरढोण येथील रहिवासी असून तिने रयत शिक्षण संस्थेच्या रमजान शेठ बाणदार विद्यालयात शिक्षण घेतले. लहानपणापासूनच अभ्यासात हुशार असलेल्या सृष्टीने नियमित, शिस्तबद्ध आणि नियोजनपूर्वक अभ्यास करून हे यश मिळवले. या यशामागे तिला शाळेतील शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून मिळवलेले हे यश अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. सृष्टीच्या या उज्ज्वल यशाबद्दल गावासह सर्व स्तरांतून तिचे कौतुक होत असून तिच्या कर्तृत्वामुळे गुरव कुटुंबाचा संघर्ष सार्थकी लागल्याची भावना व्यक्त होत आहे.