Maharashtra Rainfall | सर येते धावून...पण पाऊस जातो वाहून!

राज्यात पडणार्‍या पावसाचे प्रमाण 11 हजार 654 टीएमसी; साठवण क्षमता मात्र अवघी 1,715 टीएमसी
Maharashtra Rainfall |
Maharashtra Rainfall | सर येते धावून...पण पाऊस जातो वाहून!Pudhari Photo
Published on
Updated on

सुनील कदम

कोल्हापूर : राज्यात सरासरी दरवर्षी पडणार्‍या पावसाचे प्रमाण तब्बल 11 हजार 654 टीएमसी इतके आहे; पण राज्यातील सर्व धरणांची मिळून पाणी साठवण क्षमता फक्त 1,715 टीएमसी इतकीच आहे. परिणामी, पावसाचे बाकीचे सगळे पाणी वाहून जाते.

राज्यातील पर्जन्यमान

मान्सूनबाबत राज्याची दरवर्षीची सर्वसाधारण स्थिती पुढीलप्रमाणे असते : मुंबई व उपनगरे वगळता राज्यातील उर्वरित 355 तालुक्यांमध्ये सरासरी 86.40 टक्के पर्जन्यवृष्टी होते. त्यापैकी 19 तालुक्यांमध्ये अतिवृष्टी, 190 तालुक्यांमध्ये सरासरी पाऊस पडतो, तर 145 तालुक्यांमध्ये अल्पवृष्टी होते. राज्यात संपूर्ण मान्सून काळात सरासरी पर्जन्यवृष्टी 1,055 मिलिमीटर इतकी होते.

निसर्गाचे वरदान!

दहा-बारा वर्षांतील एखादे वर्ष वगळता महाराष्ट्राला जवळपास 330 लाख कोटी लिटर पाणी निसर्ग पावसाच्या रूपाने दरवर्षी देतोच देतो. (330 लाख कोटी लिटर म्हणजे 11 हजार 654 टीएमसी) मात्र राज्यातील 3,028 धरणांची एकूण जलसाठा क्षमता केवळ 1,715 टीएमसी इतकीच आहे. पावसाचे पडणारे उर्वरित 9,939 टीएमसी पाणी समुद्राकडे किंवा अन्य राज्यांत वाहून जाते. हे पाणी अडवून त्याची साठवणूक करण्याचे कोणतेही नियोजन सध्या तरी राज्य शासनाकडे असलेले दिसत नाही. म्हणजेच, स्वातंत्र्यानंतर आजअखेर दरवर्षी पडणार्‍या पावसापैकी फक्त 14.71 टक्के पाणी साठवण्याची कामगिरी महाराष्ट्राला साध्य करता आली आहे. त्याचा परिणाम म्हणून जवळपास निम्म्या राज्याला दरवर्षी काही ना काही प्रमाणात दुष्काळाचे आणि पाणीटंचाईचे चटके सहन करावे लागतात.

उपलब्धता आणि वापरातील विसंगती

राज्यात दरवर्षी पावसाच्या पाण्यासह उपलब्ध होणार्‍या 5,158 टीएमसी पाण्यापैकी 2,966 टीएमसी पाण्याचा वापर होतो, याचा अर्थ राज्याकडे अजूनही 2,192 टीएमसी पाणी शिल्लक आहे, असा गैरसमज होणे शक्य आहे; पण राज्यात नदी, नाले-ओढे, तलावांसह असे काही पाण्याचे नैसर्गिक स्रोत आहेत, जे इतके प्रदूषित झाले आहेत की, त्या पाण्याचा कोणत्याही कारणासाठी वापर घातक बनला आहे. त्यामुळे राज्यात आवश्यकतेपेक्षा जवळपास 2,192 टीएमसी जादा पाण्याची उपलब्धता असूनही राज्यातील 173 तालुके म्हणजेच जवळपास 50 टक्के क्षेत्र अजूनही दुष्काळी आहे. याबाबी पाण्याची उपलब्धता आणि वापरातील विसंगती स्पष्ट करतात.

राज्यातील पाण्याची वार्षिक उपलब्धता आणि वापर

भूपृष्ठावर उपलब्ध असलेले पाणी : 3,842 टीएमसी

परराज्यांतून मिळणारे पाणी : 378 टीएमसी

भूजलाची उपलब्धता : 753 टीएमसी

एकूण वार्षिक उपलब्धता : 5,158 टीएमसी

वार्षिक घरगुती वापर : 270 टीएमसी

औद्योगिक वार्षिक वापर : 90.82 टीएमसी

सिंचनासाठी वार्षिक वापर : 2,096 टीएमसी

परराज्यांना दरवर्षी द्यायचे पाणी : 510 टीएमसी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news