

कुरुंदवाड : महाराष्ट्राच्या राजकारणातील एक चांगला, धडाडीचा आणि निर्णयक्षम नेता काळाच्या पडद्याआड गेला, ही खंत कायम राहणारी आहे. या घटनेमुळे महाराष्ट्राचे फार मोठे नुकसान झाले असून मराठी माणसासाठी हा मोठा आघात आहे, अशा शब्दांत मराठी चित्रपट ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी आपली भावना व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली.
अशोक सराफ म्हणाले की, “कोणतीही गोष्ट करायची ठरवली तर ती केलीच पाहिजे, झालीच पाहिजे, अशी धडाडी अजित पवार यांच्या व्यक्तिमत्त्वात होती. निर्णय घेण्याची ठाम भूमिका, काम करण्याची जिद्द आणि स्पष्टपणा ही त्यांची ओळख होती. अशी व्यक्तिमत्त्वे पुन्हा पुन्हा घडत नाहीत.”
ते पुढे म्हणाले की, राजकारणात असूनही त्यांनी सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नांशी नाळ जोडून ठेवली होती. विकासकामे असोत, निर्णयक्षमता असो वा प्रशासकीय कामकाजातील शिस्त – त्यांच्या कार्यशैलीचा ठसा महाराष्ट्राच्या राजकारणावर कायम राहील. आज ते आपल्यात नसल्याने केवळ राजकीयच नव्हे, तर सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रालाही मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
“मराठी माणसासाठी आणि महाराष्ट्रासाठी त्यांनी दिलेले योगदान विसरता येणार नाही. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झालेली पोकळी भरून निघणे कठीण आहे,” असे नमूद करत अशोक सराफ यांनी त्यांच्या कार्याला सलाम केला. अखेरीस त्यांनी, “ही खंत मनात कायम राहील. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो,” असे म्हणत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.