

कोल्हापूर : सीआरएस अंतर्गत जुने दाखले देताना घाेटाळा होऊ नये यासाठी महापालिका अधिकाऱ्यांनी सतर्क राहून पारदर्शकता बाळगावी, अशी सूचना माजी खा. किरीट सोमय्या यांनी सोमवारी (दि. ६) केली.
सोमय्या यांनी महापालिकेत अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यासंदर्भात चर्चा केली. महापौर रूपाराणी निकम, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, सभागृह नेता मुरलीधर जाधव, भाजपचे जिल्हाध्यक्ष नगरसेवक विजय जाधव, नगरसेवक अभिजित खतकर प्रमुख उपस्थित होते.
केंद्र शासनाने सीआरएस ही जन्मदाखला देण्यासाठी नवी पद्धती लागू केली आहे. त्यावर क्यूआर कोड आहे. कोल्हापूर महापालिकेत १ सप्टेंबर २०२२ पासून त्यानुसार दाखले देण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. संदर्भासाठी जुन्या सिस्टीमचा आधार घेतला जात असल्याचे महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी माजी खासदार किरीट सोमय्या यांनी जन्म-मृत्यू दाखल्यांच्या वितरणाबाबत सविस्तर माहिती घेतली. सीआरएस प्रणाली लागू झाल्यानंतर जुन्या नोंदींवरील दाखले कोणत्या पद्धतीने दिले जातात, जुन्या अर्जांची प्रक्रिया कशी केली जाते, सीआरएस प्रणालीअंतर्गत जुन्या दाखल्यांचाही समावेश करण्यात आला आहे का? याबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली.
जुन्या पद्धतीने दाखले वितरित करताना गैरव्यवहार होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने अशा दाखल्यांचे वितरण करताना दक्षता घेण्यात यावी. तसेच संबंधित विभागातील संपूर्ण यंत्रणा सतर्क ठेवून प्रत्येक प्रकरणाची पडताळणी करूनच दाखले वितरित करावेत. नावातील मात्रा, वेलांटी असे किरकोळ बदल चालतील; पण कुणाचे पूर्ण नाव बदलून बदलताना काळजीपूर्वक काम करा, अशी सूचना केली. यावेळी उपायुक्त किरणकुमार धनवाडे, नगरसेवक अभिजित खतकर, विजय खाडे, जन्म-मृत्यू निबंधक डॉ. मनीषा चव्हाण, सहा.सांख्यिकी अधिकारी संजय कुंभार, अभय तेंडुलकर, सागर राणे उपस्थित होते.