

एकनाथ नाईक
कोल्हापूर : भारतात डिजिटल अवयवदान नोंदणीमध्ये 17 सप्टेंबर 2023 पासून आतापर्यंत 4.5 लाखांहून अधिक लोकांनी अवयवदानाची इच्छा व्यक्त केली आहे. या नोंदणीतील राज्यनिहाय आकडेवारीत महाराष्ट्र सर्वाधिक म्हणजे 1 लाखापेक्षा अधिक डिजिटल अवयवदान इच्छापत्रांसह देशात अव्वल ठरला आहे. राजस्थान 91 हजार 42, तर कर्नाटक 52 लाख 304 जणांनी नोंदणी नॅशनल ऑर्गन अँड टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशनकडे केली आहे.
शहरी लोकसंख्येत अग्रस्थानावर असणारी दिल्ली अवयवदात्यांच्या नोंदणीमध्ये खूप मागे आहे. फक्त 5 हजार 506 लोकांनीच अवयवदानाची तयारी दर्शविली आहे. अवयवदान नोंदणी करणार्यांमध्ये 18 ते 30 वर्षांखालील तरुणांची संख्या जास्त आहे. 1 लाख इच्छापत्रे तरुण या वयोगटातील आहेत, तर वृद्धांमध्ये जागरूकता तुलनेने कमी आहे. तरुणांमध्ये बदललेली विचारसरणी, माहिती आणि सामाजिक भान वाढल्याने हा कल वाढल्याचे पाहायला मिळत आहे.
अवयव प्रतीक्षा यादी
यकृत : 3 लाखांपेक्षा अधिक
हृदय : 3 लाखांपेक्षा अधिक
फुफ्फुस : 3 लाखांपेक्षा अधिक
आतडे : 2.9 लाखांपेक्षा अधिक
स्वादूपिंड : 1.2 लाखापेक्षा अधिक
डिजिटल अवयवदान नोंदणी; टॉप पाच राज्ये
महाराष्ट्र : 1 लाख 1 हजारपेक्षा अधिक
राजस्थान : 91,043
कर्नाटक : 52, 304
गुजरात : 41, 400
मध्य प्रदेश : 24, 215