

वारणानगर : महाराष्ट्र, कर्नाटकातील हजारो कुस्तीशौकिनांच्या साक्षीने जय-पराजयाची तमा न बाळगता ईर्ष्येने लढणार्या नामवंत मल्लांचा खणाणता शड्डू वारणानगर (ता. पन्हाळा) येथील कुस्ती मैदानात घुमला. या आंतरराष्ट्रीय मैदानात विश्वनाथ वारणा शक्ती श्री कुस्ती महासंग्रामात झालेल्या प्रथम क्रमांकाच्या लढतीत अपेक्षेप्रमाणे गतवेळचा विजेता गंगावेस तालमीचा मल्ल, महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख याने इजिप्तचा ऑलिम्पियन मल्ल अहमद तौफिक याला घिस्सा डावावर सातव्या मिनिटाला अस्मान दाखवून आपणच वारणेचा ‘सिकंदर’ असल्याचे सिद्ध केले. सिकंदरला वारणा उद्योग समूहाचे प्रमुख आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) यांच्या हस्ते जनसुराज्य शक्ती श्री किताबाची गदा, रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. यावेळी आमदार अशोकराव माने, युवा नेते विश्वेश कोरे, जनसुराज्य शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे, शाहूवाडीचे प्रांताधिकारी समीर शिंगटे यांच्यासह प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
द्वितीय क्रमांकाच्या ‘वारणा साखर शक्ती श्री’ लढतीत कोल्हापूरचा महाराष्ट्र केसरी पैलवान पृथ्वीराज पाटील याने इजिप्तच्या जागतिक विजेता सल्लाउद्दीन अब्बास याच्यावर नाकपट्टी डावावर लोळवून ‘वारणा साखर शक्ती श्री’ किताब पटकावला. तृतीय क्रमांकाच्या लढतीत शैलेश शेळके याला घुटना डावावर पंजाबच्या भूपेंद्र अजनाळा याने अस्मान दाखविले. त्याला ‘वारणा दूध संघ शक्ती श्री’ किताब देण्यात आला.
वारणा परिसरचे भाग्यविधाते सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे यांच्या 30 व्या पुण्यस्मरणार्थ आज (दि. 13) वारणानगर येथील वारणा विद्यालयाच्या प्रांगणात विश्वनाथ वारणा शक्ती श्री कुस्ती महासंग्राम महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद पुणे, कोल्हापूर जिल्हा शहर व राष्ट्रीय तालीम संघ यांच्या मान्यतेने आंतरराष्ट्रीय कुस्त्यांचे मैदान झाले. भारतासह इजिप्तमधील मल्लांच्या या लढती तब्बल आठ तास चालल्या. देशभरातील नामवंत पैलवानांनी ‘हम भी कुछ कम नही’ असे दाखवून देत प्रमुख दहा लढतींसह आठ तासांत दोनशेच्यावर काटाजोड कुस्त्या केल्या.
तत्पूर्वी, दुपारी दोन वाजता कुस्ती मैदानाचे पूजन युवा नेते विश्वेश कोरे यांच्या हस्ते झाले. या मैदानात हिंदकेसरी दीनानाथ सिंह, ऑलिम्पिकवीर बंडा पाटील-रेठरेकर, महाराष्ट्र केसरी रावसाहेब मगर यांच्यासह उपमहाष्ट्र केसरी, राष्ट्रीय विजेते, नामवंत मल्लसह मोठ्या संख्येने कुस्तीशौकीन उपस्थित होते. वारणा कुस्ती केंद्राचे वस्ताद संदीप पाटील यांनी मैदानाचे संयोजन केले तर समालोचन ईश्वरा पाटील यांनी केले.
या आंतरराष्ट्रीय कुस्तीच्या महासंग्रामातील मानाची प्रथम क्रमांकाची कुस्ती ‘जनसुराज्य शक्ती श्री’ किताबासाठी महान भारत केसरी सिकंदर शेख (गंगावेस, कोल्हापूर ) आणि जागतिक विजेता विरुद्ध अहमद तौफिक (इजिप्त) यांच्यात रात्री 9.45 वाजता कुस्तीला सुरुवात झाली. उंचापुरा अहमद मैदानात आल्या आल्या शौकिनांचे लक्ष वेधून घेतले. एखाद्या कसलेल्या जिम्नॅस्टिकपटूप्रमाणे जागेवरती दोनवेळा उलटी उडी मारली आणि शौकिनांनी मैदान डोक्यावर घेतले. मातीतील लढतीचा अनुभव असणार्या सिकंदरने अहमदला ठेपे लावत खाली घेतले आणि घिस्सा ओढत चितपटीचा प्रयत्न केला. मात्र मातीत प्रथमच खेळणार्या अहमदने हा प्रयत्न धुडकावून लावत सिकंदरलाच खाली घेण्याचा प्रयत्न केला. सिकंदरने आपला कब्जा कायम ठेवत दुसर्यांदाही घिस्सा ओढला. कब्जा कायम असताना अहमद सिकंदरच्या तावडीतून उठण्याचा प्रयत्न करत होता. या संधीचा लाभ उठवत अनुभवी सिकंदरने त्याला खाली खेचत घिस्सा लावत सातव्या मिनिटाला अप्रतिम विजय मिळविला. यावेळी शौकिनांनी टाळ्यांचा कडकडाट केला. सिकंदरने मैदानात फिरून शौकिनांचे आभार मानले.
‘वारणा साखर शक्ती श्री’साठीची दुसर्या क्रमांकाची कुस्ती महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील (कोल्हापूर) विरुद्ध जागतिक विजेता सल्लाउद्दीन अब्बास (इजिप्त) यांच्यातील कुस्ती 9.25 ला सुरू झाली. सहा फूट उंचीचा अब्बास पृथ्वीराजच्या मानाने तगडा वाटत होता. त्यामुळे शौकिनांचे सर्व लक्ष या लढतीकडे होते. या लढतीत पृथ्वीराजने आक्रमक होत अब्बासला गर्दन खेचत जेरीस आणण्याचा प्रयत्न सुरू ठेवला. बगल डूब काढत पृथ्वराजने पाचव्या मिनिटाला अपेक्षेप्रमाणे अब्बासचा कब्जा घेतला व पोकळ घिस्सा मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, मातीत प्रथमच खेळणार्या अब्बासने तो असफल ठरविला. पृथ्वीराजने कब्जा कायम ठेवत एकलंगी, नाकपट्टी लावत प्रतिस्पर्ध्याला जेरीस आणले. अब्बास 15 मिनिटांतच दमला. दुसर्यांदा नाकपट्टी लावत पृथ्वीराज पाटीलने विजय मिळविताच प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
‘वारणा दूध संघ शक्ती श्री’ किताबासाठी शैलेश शेळके (पुणे) विरुद्ध भारत केसरी भूपेंद्र अजनाळे (पंजाब) यांच्यात झाली. सुरुवातीला शैलेश शेळकेचा तब्बल तीनवेळा पट काढण्याचा प्रयत्न भूपेंद्रने धुडकावून लावला अखेर पाचव्या मिनिटाला भूपेंद्रनेच एकेरी पटावर शैलेशला खाली घेतले. आणि डाव्या पायाचा घुटना ठेवत विजय मिळविला. ‘वारणा बँक शक्ती श्री’ किताबासाठी उपमहाराष्ट्र केसरी प्रकाश बनकर (गंगावेस, कोल्हापूर) विरुद्ध हिंदकेसरी दिनेश गुलिया (दिल्ली) यांच्यातील कुस्ती सुरू होताच दिनेशने आक्रमक होत प्रकाशवर ताबा घेतला. पुन्हा खडाखडी सुरू होताच प्रकाशला वस्ताद संदीप पाटील यांनी मागे सरकून न खेळण्याची समज दिली. काटाजोड झालेली कुस्ती बराच वेळ खडाखडी सुरू होती. अखेर ही कुस्ती वीस मिनिटांनी पंच बटू जाधव यांनी गुणावर लावली. यामध्ये दिनेश गुलिया गुणावर विजयी झाला.
‘वारणा दूध-साखर वाहतूक शक्ती श्री’साठी राष्ट्रीय विजेता दादा शेळके (पुणे) व राष्ट्रीय विजेता मनजीत खत्री (हरियाणा) यांच्यातील कुस्ती अत्यंत काटाजोड झाली. दहा मिनिटांच्या कुस्तीत डाव-प्रतिडावाची उधळण झाल्याने कुस्तीशौकिनांचे डोळ्याचे पारणे फिटले. आक्रमक असणार्या दादा शेळकेने पाय लावून घिस्सा या डावावर मनजीतला अस्मान दाखविले. ‘वारणा ऊस वाहतूक शक्ती श्री’ किताबासाठी राष्ट्रीय विजेता रवी चव्हाण याने झोळी डावावर आशियाई विजेता प्रवीण चहर (दिल्ली) याला अस्मान दाखविले. ‘वारणा बिल ट्यूब शक्ती श्री’ डबल कर्नाटक केसरी कार्तिक काटे (कर्नाटक) विरुद्ध जागतिक विजेता जॉन्टी भाटिया (दिल्ली) यांच्यातील कुस्ती अत्यंत रटाळ झाली जॉन्टीने सुरुवातीपासून ठेवलेला कब्जा सार्थ ठरवत आजपर्यंत वारणेच्या मैदानात अपराजीत असणार्या कार्तिक काटेला चितपट केले.
‘वारणा शिक्षण शक्ती श्री’ किताबासाठी राष्ट्रीय विजेता संदीप मोटे (सांगली) विरुद्ध राष्ट्रीय विजेता पवनकुमार (पंजाब) यांच्यात अटीतटीची लढत झाली. यामध्ये संदीप मोटे जखमी झाल्याने पवनकुमारला विजयी घोषित केले. ‘वारणा बझार व वारणा महिला शक्ती श्री’ किताबासाठी झालेल्या अटीतटीच्या लढतीत राष्ट्रीय विजेता समीर शेख (पुणे) याने राष्ट्रीय विजेता मुन्ना (पुणे) याने ढाक डावावर विजय मिळवला. ‘ईडी अँड एफ मान शक्ती श्री’ किताबासाठी झालेल्या प्रेक्षणीय कुस्तीत राष्ट्रीय विजेता अमितकुमार (उत्तर प्रदेश) याचा एकेरी पट काढून महाराष्ट्र चॅम्पियन नामदेव केसरे याने नेत्रदीपक विजय मिळवला. ‘वारणा नवशक्ती श्री’साठी महाराष्ट्र चॅम्पियन कालीचरण सोलनकर विरुद्ध महाराष्ट्र चॅम्पियन सतपाल सोनटक्के (टेंभुर्णी) यांच्यात झाली. घिस्सा डावावर कालीचरणने 15 व्या मिनिटात विजय मिळविला. याशिवाय या मैदानात शुभम कोळेकर (गंगावेस), रोहन रंडे (मुरगूड), प्रथमेश गुरव (वारणा), अतुल डावरे (मोतीबाग), शशिकांत बोंगार्डे (शाहूपुरी), पांडुरंग शिंदे, भगतसिंग खोत (माळवाडी) या कुस्त्यांसह 250 वर लहान-मोठ्या लढती झाल्या.
नुकताच बेळगाव येथे झालेल्या कर्नाटक विधानसभेच्या अधिवेशनाविरोधात बेळगावसह सीमा भाग महाराष्ट्रात समाविष्ट करावा, या मागणीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने आयोजित केलेल्या महामेळाव्यातील कार्यकर्ते माजी नगरसेवक व खानापूर कुस्ती संघाचे अध्यक्ष मनोहर हालगेकर यांना अटक केली होती. त्याच्यासह सुरेश पाटील, मंजुनाथ पालनकर आदी कार्यकर्ते मैदानात आपल्या मागणीसाठी मुद्दाम उपस्थित राहिल्याचे सांगितले.
वारणानगरला तात्यासाहेब कोरे यांच्या पहिल्या समृतिदिनानिमित्तापासून गेली 29 वर्षे मैदानाचे धावते वर्णन करणारे 77 वर्षे वय असणारे पै. शंकर पुजारी यांनी गतवर्षी वारणेच्या मैदानात निवृत्ती जाहीर केली. प्रत्येक पैलवानाच्या तीन पिढ्यांची माहिती असणारे ते एकमेव निवेदक आहेत. त्याची उणीव आज भासली.
शिंपे (ता. शाहूवाडी) येथील राष्ट्रीय विजेते पै. हरी पाटील यांना आमदार डॉ. विनय कोरे यांच्या हस्ते तात्यासाहेब कोरे कुस्तीभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. रोख रक्कम व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.