

कोल्हापूर : बारावीची माहिती - तंत्रज्ञान (आयटी) आणि सामान्यज्ञान (जीके) विषयांची ऑनलाईन परीक्षा तांत्रिकदृष्ट्या सुरक्षित व पारदर्शक करण्यासाठी कोल्हापूर विभागीय मंडळाने कठोर उपाययोजना केल्या आहेत. यंदा परीक्षेत होणाऱ्या गैरप्रकारांना चाप लावण्यासाठी ‘डिजिटल’ लॉक लावण्यात आले आहे. कोल्हापूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी स्वतः एका केंद्रावर विद्यार्थ्याच्या भूमिकेत शिरून ‘डेमो एक्झाम’ दिली. राज्य मंडळाकडून पहिल्यांदाच स्क्रीन रेकॉर्डिंगचा अभिनव प्रयोग परीक्षेत होणार आहे.
कोल्हापूर विभागातील तीन जिल्ह्यांमध्ये ही ऑनलाईन परीक्षा होणार आहे. यामध्ये एकूण 31 हजारांहून विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात 112 आयटी केंद्रांवरून 13 हजार 352 , सातारा जिल्ह्यात 76 आयटी केंद्रांवरून 8 हजार 362 विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. सांगली जिल्ह्यात 55 आयटी केंद्रांवरून 4 हजार 598 विद्यार्थी परीक्षा देतील. कोल्हापूर विभागात 322 आयटी केंद्रांवर 31 हजार 525 विद्यार्थी परीक्षा देतील.
परीक्षा सुरळीत होण्यासाठी कोल्हापूर विभागीय सचिव सुभाष चौगुले यांनी क्षेत्रीय अधिकारी व केंद्र संचालकांना आवश्यक सर्व सूचना दिल्या आहेत. प्राचार्य किंवा उपप्राचार्य सर्वस्वी जबाबदार असतील. यंदा सर्वात मोठा बदल म्हणजे पर्यवेक्षक संबंधित महाविद्यालयाचे नसतील, तर ते त्रयस्थ असतील, ज्यामुळे ‘आपल्या’ विद्यार्थ्याला मदत करण्याचे प्रकार थांबतील. आयटी शिक्षक केवळ तांत्रिक बिघाड दुरुस्तीसाठी उपलब्ध असतील. त्यांना लॅबमध्ये प्रवेश असणार नाही.
थेट पोलीस कारवाईचा इशारा
गैरप्रकार करणाऱ्यांवर केवळ शैक्षणिक कारवाई होणार नाही, तर महाराष्ट्र अधिनियम 1982 आणि आयटी ॲक्ट 2000 नुसार फौजदारी गुन्हे दाखल केले जातील. तोतया परीक्षार्थी आढळल्यास तत्काळ अटक करण्याचे आदेश आहेत. जिल्हास्तरावरून शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांना भरारी पथके व बैठी पथके नियुक्त करण्याच्या सूचना दिल्या आहेत.