Sahyadri Ghat : सह्याद्री न वाचल्यास जबर किंमत मोजावी लागणार

केंद्राच्या सातव्या अधिसूचनेची तंतोतंत अंमलबजावणी गरजेची
Sahyadri Ghat
Sahyadri Ghat
Published on: 
Updated on: 

सुनील कदम

कोल्हापूर : केंद्र शासनाने सह्याद्री पर्वत रांगेतील सहा राज्यातील पर्यावरणदृष्ट्या अतिसंवेदनशील क्षेत्राचे संरक्षण करण्याच्या हेतूने सातवी अधिसूचना जारी केली आहे. महाराष्ट्रासह अन्य काही राज्यांनी या अधिसूचनेबाबत हरकती नोंदविल्या आहेत. मात्र राज्याच्या एकूणच भवितव्याचा विचार करता आता सह्याद्री वाचविण्याची गरज आहे. अन्यथा भविष्यात त्याची जबर किंमत चुकवावी लागल्याशिवाय राहणार नाही.

सह्याद्री ही केवळ एक पर्वतरांग नाही, तर जवळपास संपूर्ण दक्षिण भारताची जीवनवाहिनी आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. गुजरातपासून महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळपर्यंत सहा राज्यांमध्ये ही पर्वतरांग पसरलेली आहे. सह्याद्रीची एकूण लांबी १६०० किलोमिटर असून एकूण क्षेत्रफळ १ लाख ६० हजार चौरस किलोमिटर इतकी आहे. संपूर्ण भारताचा विचार करता देशातील केवळ ५ टक्के भूभाग सह्याद्रीने व्यापला असला तरी दक्षिण भारताच्या दृष्टीने त्याचे महत्त्‍व दैनंदिन जीवनाशी निगडित आहे. त्यामुळे यापुढे सह्याद्रीतील मानवी हस्तक्षेप राज्यासह संपूर्ण दक्षिण भारताच्या पतनास हातभार लावण्याचा धोका आहे.

पर्यावरणीय महत्त्‍व!

जगाच्या पाठीवर जैवविविधतेने समृद्ध अशी केवळ ३६ ठिकाणे आहेत आणि त्यापैकी सह्याद्रीचे पठार हे एक आहे. त्यामुळेच युनेस्कोने (संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना) सह्याद्रीला जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे. इथे इतकी समृद्ध जैवविविधता आढळून येते की जगाच्या पाठीवर अन्यत्र ती कुठेही आढळून येत नाही. सह्याद्रीच्या जंगलामध्ये ४००० प्रकारचे विविध वृक्ष, ५००० प्रकारची फुलझाडे, हत्ती, वाघ, बिबट्या, अस्वल, हरीण, काळवीट, शेखरू, लाजवंती, रानगवा, रानडुकरे, रानकुत्री, लांडगा, तरस यासह प्राण्यांच्या १३९ प्रजाती आढळून येतात. ५०८ प्रकारचे पक्षी, उभयचर प्राण्याच्या १७९ प्रजाती आणि १८७ प्रकारचे सरपटणारे प्राणी इथे आढळून येतात. याच्याशिवाय वनस्पती आणि पशू-पक्षांच्या अनेक दुर्मीळ प्रजाती इथे आढळून येतात. इतकी जैवविविधता एक ॲमेझॉनचे जंगल सोडले तर जगात अन्यत्र कुठेही आढळून येत नाही.

क्षेत्र घटविण्याची मागणी!

केंद्राच्या अधिसूचनेनुसार सह्याद्रीतील अतिसंवेदनशील क्षेत्रामध्ये ६ राज्यातील ४४०२ गावे येतात. विकासकामे व अन्य कारणांसाठी महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळमने या अधिसूचनेला हरकत घेऊन संवेदनशील क्षेत्र कमी करण्याची मागणी केली. तसे झाल्यास सह्याद्रीतील जंगलक्षेत्र आणखी घटून सह्याद्रीत केवळ २५ टक्क्यांच्या आसपासच जंगल शिल्लक राहील. भविष्याच्या दृष्‍टिकोनातून ही धोक्याची घंटा ठरणार आहे.

सह्याद्रीचा झालाय ऱ्हास !

देशाला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी सह्याद्री पर्वतरांगेचा सुमारे ७० टक्के भूभाग समृद्ध जंगलाने व्यापलेला होता. पण काळाच्या ओघात झालेली अमर्याद वृक्षतोड, विविध कारणांसाठी झालेली जंगलतोड यामुळे सध्या सह्याद्रीत केवल ३७ टक्के (५६ हजार ८२५ चौरस किलोमीटर) इतकेच जंगल शिल्लक राहिलेले आहे. त्यामुळेच २०११ साली डॉ. माधव गाडगीळ यांच्या समितीने सह्याद्रीतील ७५ टक्के (१ लाख २९ हजार चौरस किलोमिटर) क्षेत्र पर्यावरणदृष्ट्या अतिसंवेदनशील म्हणून घोषित करण्याची शिफारस केली होती. मात्र त्यानंतर नेमलेल्या डॉ. के. कस्तुरीरंगन समितीने हे क्षेत्र ५६ हजार ८२५ चौरस किलोमीटर (३५.५१ टक्के) इतके कमी केले. आता हे क्षेत्र केंद्र शासनाने अतिसंवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करण्यासाठी केंद्राने अधिसूचना जारी केली आहे, त्याला महाराष्ट्रासह अन्य राज्यांनी विरोध दर्शविला आहे.

सह्याद्रीचे जीवनमान

  • १६०० किलोमीटर सह्याद्रीची लांबी असून क्षेत्रफळ १,६०,००० चौरस कि.मी. आहे.

  • ४,००० प्रकारचे वृक्ष, ५,००० प्रकारची फुलझाडे आहेत ‘सह्याद्री’च्या जंगलामध्ये

  • १३९ प्राण्यांच्या प्रजाती आणि

  • तब्बल ५०८ प्रकारचे पक्षी आढळतात

  • सह्याद्री क्षेत्रात

  • १७९ प्रजाती आहेत उभयचर

  • प्राण्यांच्या, तर १८७ प्रकारचे

  • सरपटणारे प्राणी आढळतात

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.