World COPD Day : राज्यात चार वर्षांत ७८ हजार जणांना फुप्फुसांचे गंभीर आजार

‘सीओपीडी’ आजाराच्या निदानात दोन वर्षांमध्ये ११० टक्के वाढ; वाहनांचा धूर आणि सूक्ष्म धूलिकणांचा फुप्फुसांवर परिणाम
World COPD Day
World COPD Day
Published on: 
Updated on: 

आशिष शिंदे

कोल्हापूर : वाढते वायुप्रदूषण, वाहनांचा धूर, बांधकामांमधून उडणारी धूळ आणि हवेतील सूक्ष्म धूलिकणांमुळे फुप्फुसांचे आरोग्य गंभीर होत आहे. महाराष्ट्रात फुप्फुसाच्या गंभीर आजाराचे (क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज) निदान झालेल्या रुग्णांची संख्या अवघ्या दोन वर्षांत दुपटीहून अधिक झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या चार वर्षांत ७८,८८६ जणांना दीर्घकालीन अवरोधक फुप्फुस विकार झाल्याची माहिती राज्य सरकारच्या अहवालातून समोर आली आहे.

जागतिक सीओपीडीदिनाच्या पार्श्वभूमीवर ही आकडेवारी फुप्फुसांच्या आरोग्याबाबत चिंता वाढवणारी ठरत आहे. प्रदूषित हवेत दीर्घकाळ श्वास घेतल्याने श्वसनसंस्थेवर विपरीत परिणाम होऊन दीर्घकालीन अवरोधक फुप्फुस विकार अर्थात सीओपीडीचा धोका वाढू शकतो. २०२२-२३ मध्ये १४ हजार १४ फुप्फुस विकार रुग्णांचे निदान झाले होते. २०२४-२५ मध्ये ही संख्या २९ हजार ३९३ वर पोहोचली. म्हणजेच निदान झालेल्या रुग्णांच्या संख्येत तब्बल ११० टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे.

काय आहे सीओपीडी

क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज म्हणजे दीर्घकालीन अवरोधक फुप्फुस विकार. हा फुप्फुसांच्या कार्यक्षमतेवर परिणाम करणारा गंभीर आणि दीर्घकालीन आजार आहे. यामध्ये फुप्फुसांमधील श्वसनमार्ग अरुंद होतात किंवा त्यांना सूज येते. त्यामुळे श्वास घेताना आणि सोडताना अडथळा निर्माण होतो.

प्रदूषणाचा फुप्फुसांवर असा होतो परिणाम

हवेतील पीएम २.५ आणि पीएम १० धूलिकण, वाहनांमधून बाहेर पडणारे प्रदूषक, औद्योगिक धूर आणि घरगुती इंधनाच्या ज्वलनातून निर्माण होणारे प्रदूषण श्वसनसंस्थेसाठी घातक ठरू शकते. प्रदूषित हवेत दीर्घकाळ राहिल्यास श्वसनमार्गात दाह निर्माण होणे, फुप्फुसांची कार्यक्षमता कमी होणे आणि श्वसन विकारांचा धोका वाढणे असे परिणाम संभवतात. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, धूम्रपान करणाऱ्या व्यक्ती आणि आधीपासून श्वसन विकार असलेल्या रुग्णांनी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.