

कोल्हापूर : सार्वजनिक आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकार्यांची शेकडो पदे रिक्त आहेत. ती त्वरित भरण्याची कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले आहेत. 25 डिसेंबर 2024 रोजी दै. ‘पुढारी’ने ‘सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण विभागात तज्ज्ञ डॉक्टरांची 1 हजार 522 पदे रिक्त’ असे वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेऊन मंत्री आबिटकर यांनी प्रतीक्षा यादीवरील एमबीबीएस उमेदवारांना तातडीने नियुक्ती देण्याची सूचना केली आहे.
नवीन डॉक्टरांची भरती मार्च महिन्यापूर्वी सुरू करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. आरोग्य विभागातून निवृत्त झालेले वैद्यकीय अधिकारी आणि तज्ज्ञ यांना परत सेवेत घेण्यात येणार आहे. त्यासाठी वेळप्रसंगी नियमात बदल करण्याचा सूचनाही मंत्री आबिटकर यांनी दिल्या आहेत. राज्यात डॉक्टरांची 3 हजार 642 पदे मंजूर आहेत. त्यापैकी 2 हजार 120 पदे भरली आहेत, तर तब्बल 1 हजार 522 डॉक्टरांची पदे रिक्त आहेत. राज्याच्या लेखापरीक्षणात (कॅग) ही बाब निदर्शनास आली होती. तज्ज्ञांच्या अभावामुळे आरोग्यसेवेवर परिणाम होत आहेत.
राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभाग व औषधी द्रव्य विभागाच्या अंतर्गत डॉक्टरांची 27 टक्के पदे रिक्त होती. रुग्णांची वाढती संख्या आणि अपुरे डॉक्टर यामुळे वैद्यकीय सेवेत मर्यादा येत होत्या. जिल्हा रुग्णालय, स्त्री रुग्णालये, सामान्य रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची हेळसांड होत होती. डॉक्टरांची पद भरती झाल्याने आता रुग्णांवर वेळेत उपचार होणार आहेत.
आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकार्यांनी रुग्णालयास अचानक भेटी द्याव्यात. रुग्णालयातील स्वच्छता, आहाराचा दर्जा, रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मिळणारी वागणूक, औषधांची उपलब्धता, बाह्य संस्थेद्वारे नेमलेल्या कर्मचार्यांना मिळणारे मानधन, तेथील सोयी- सुविधा, गैरसोयी आदींची पाहणी करावी, असे निर्देश आरोग्यमंत्री आबिटर यांनी दिले आहेत.