

आशिष शिंदे
कोल्हापूर : जागतिक बाजारातील विविध आव्हानांवर मात करत महाराष्ट्राने चालू वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत निर्यातीत उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे. जानेवारी ते जून २०२६ या सहा महिन्यांत महाराष्ट्रातून ३ लाख ४१ हजार २९७ कोटी रुपये मूल्याची विविध वस्तूंची निर्यात झाली. या निर्यातीत पारंपरिक दागिने, हिरे व्यवसायासोबतच यंत्रसामग्री, वाहननिर्मिती, विद्युत उपकरणे, औषधनिर्मिती आणि रसायन उद्योगांचा मोठा वाटा राहिला. जानेवारीच्या तुलनेत जूनमध्ये महाराष्ट्राच्या मासिक निर्यातीत सुमारे ८ टक्क्यांची वाढ झाली आहे. म्हणजेच सहा महिन्यांत ४,३२६ कोटी रुपयांनी निर्यात वाढली आहे.
वाणिज्य विभागाच्या वस्तूनिहाय आकडेवारीनुसार, महाराष्ट्राच्या निर्यातीमध्ये मौल्यवान धातू, हिरे, मोती आणि दागिने या वस्तूगटाचा सर्वाधिक वाटा राहिला. सहा महिन्यांत या गटातून ६० हजार ५५८ कोटी रुपयांची निर्यात झाली. त्यानंतर यंत्रसामग्री व यांत्रिक उपकरणे ४३ हजार ६९७ कोटी, वाहने व वाहनांचे भाग २९ हजार १८ कोटी, विद्युत यंत्रसामग्री व उपकरणे २६ हजार ९४५ कोटी आणि औषधे व औषधनिर्मिती उत्पादने २४ हजार २६० कोटी रुपयांची निर्यात झाली. या पाच प्रमुख वस्तूगटांचा मिळून महाराष्ट्राच्या सहा महिन्यांच्या निर्यातीत निम्म्याहून अधिक वाटा आहे.
रसायने, पोलाद, प्लास्टिकचाही निर्यातीत वाटा
रसायने, धातू आणि त्यांच्याशी संबंधित उत्पादनांनीही महाराष्ट्राच्या निर्यातीला मोठा आधार दिला आहे. सेंद्रिय रसायनांची १८ हजार ८३१ कोटी रुपयांची, तर लोखंड, पोलादाची १० हजार ६७२ कोटी आणि त्यापासून तयार वस्तूंची १० हजार ६२० कोटी रुपयांची निर्यात झाली. याशिवाय खनिज इंधने व खनिज तेलांची ८ हजार ८२५ कोटी, तर प्लास्टिक व प्लास्टिक वस्तूंची ६ हजार ९६६ कोटी रुपयांची निर्यात नोंदविण्यात आली. यावरून महाराष्ट्राच्या निर्यातीत केवळ तयार औद्योगिक उत्पादनांचाच नव्हे, तर कच्चा माल, मध्यवर्ती उत्पादने आणि मूल्यवर्धित वस्तूंचाही मोठा वाटा असल्याचे स्पष्ट होते.
सहा महिन्यांत निर्यातीचा आकडा वाढला
यंदाच्या वर्षात महाराष्ट्राच्या निर्यातीने चढता कल कायम ठेवला आहे. जानेवारीत ५३ हजार ७७९ कोटी रुपयांपासून सुरू झालेली मासिक निर्यात जूनमध्ये ५८ हजार १०५ कोटी रुपयांवर पोहोचली. या कालावधीत काही महिन्यांत किरकोळ चढ-उतार झाले असले, तरी सहा महिन्यांच्या कालावधीत निर्यातीत एकूण वाढीचा कल दिसून येतो. सहा महिन्यांत निर्यातीचा हा आकडा सुमारे ४ हजार ३२६ कोटी रुपयांनी वाढला असून, जानेवारीच्या तुलनेत जूनमध्ये ८.०४ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली.