Maharashtra IT Powerhouse | महाराष्ट्र बनतेय आयटी पॉवरहाऊस; सॉफ्टवेअर निर्यातीने गाठला 2 लाख कोटींचा टप्पा!

एसटीपीआयचा अहवाल : राज्याच्या सॉफ्टवेअर निर्यातीत 10 वर्षांत 300 टक्यांची वाढ; कोल्हापूरच्या आयटी पार्कमुळे निर्यातीत वाढ होणार
Maharashtra IT Powerhouse |
Maharashtra IT Powerhouse | महाराष्ट्र बनतेय आयटी पॉवरहाऊस; सॉफ्टवेअर निर्यातीने गाठला 2 लाख कोटींचा टप्पा!
Published on
Updated on

आशिष शिंदे

कोल्हापूर : राज्यातील सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्कस्मधून होणार्‍या सॉफ्टवेअर निर्यातीने गेल्या दशकात नेत्रदीपक कामगिरी केली आहे. राज्याच्या अर्थव्यवस्थेत आयटी क्षेत्राचा दबदबा निर्माण झाला असून, गेल्या दहा वर्षांत राज्याच्या सॉफ्टवेअर निर्यातीत तब्बल 330 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. एसटीपीआयच्या अहवालानुसार 2015-16 मध्ये 64 हजार 63 कोटी रुपयांवर असलेली निर्यात 2024-25 या आर्थिक वर्षात 2 लाख 12 हजार 710 कोटी रुपयांच्या विक्रमी स्तरावर पोहोचली आहे. यामुळे महाराष्ट्र हे देशातील प्रमुख आयटी पॉवरहाऊस म्हणून आपली पकड घट्ट करत आहे. या सॉफ्टवेअर निर्यातीत कोल्हापूरचा वाटा देखील मोठा असून, निर्यातीत जिल्ह्याचा तिसरा क्रमांक लागतो.

राज्याच्या आयटी निर्यातीचा आलेख सातत्याने चढता राहिला आहे. 2019-20 मध्ये 91 हजार 513 कोटींवर असलेली निर्यात कोरोना संकटानंतरच्या काळात अधिक वेगवान झाली. 2021-22 मध्ये या निर्यातीने 1.25 लाख कोटींचा टप्पा ओलांडला, तर अवघ्या तीन वर्षांत त्यात जवळपास दुप्पट वाढ होऊन तो 2 लाख कोटींच्या पार गेला आहे. विशेष म्हणजे, चालू आर्थिक वर्ष 2025-26 च्या पहिल्या 10 महिन्यांतच (जानेवारीपर्यंत) 1 लाख 74 हजार 797 कोटी रुपयांची निर्यात झाली आहे. मार्चअखेर हा आकडा गेल्या वर्षीचा 2.12 लाख कोटींचा विक्रम मोडीत काढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सॉफ्टवेअर निर्यातीतील या भरघोस वाढीमुळे राज्यात केवळ परकीय चलनाची गंगाजळीच वाढली नाही, तर कुशल मनुष्यबळासाठी रोजगाराच्या मोठ्या संधीही निर्माण झाल्या आहेत. पुणे आणि मुंबई यांसारख्या शहरांतील आयटी हबचा झालेला विस्तार, नवीन स्टार्टअप्सना मिळालेले प्रोत्साहन आणि सरकारी धोरणांची साथ यामुळे ही प्रगती शक्य झाली आहे. जागतिक स्तरावर मंदीचे सावट असतानाही राज्यातील सॉफ्टवेअर युनिट्सनी आपली निर्यात क्षमता टिकवून ठेवली असून, आगामी काळात तंत्रज्ञान क्षेत्र राज्याच्या विकासाचे मुख्य इंजिन ठरेल, असा विश्वास तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.

सॉफ्टवेअर, कोडिंग, टेस्टिंग, क्लाऊड सर्व्हिसेसची होते निर्यात

जेव्हा एखादी भारतीय आयटी कंपनी अमेरिकेतील किंवा युरोपमधील एखाद्या बँकेसाठी अ‍ॅप बनवते, डेटा मॅनेजमेंट करते किंवा सॉफ्टवेअर सोल्यूशन्स पुरवते, तेव्हा त्या बदल्यात देशाला परकीय चलन मिळते. या संपूर्ण प्रक्रियेला सॉफ्टवेअर निर्यात म्हणतात. यामध्ये केवळ तयार सॉफ्टवेअरचाच समावेश नसून, कोडिंग, टेस्टिंग, आयटी कन्सल्टन्सी आणि क्लाउड सर्व्हिसेस यांसारख्या सेवांचाही समावेश होतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news