

सुनील कदम
कोल्हापूर : प्रचंड उष्णतावाढीमुळे जलाशयातील पाण्याची मोठ्या प्रमाणात वाफ झाल्याने राज्यातील मोठी १६ धरणे आता कोरडी ठाक पडली आहेत. धरणांमध्ये आजघडीला केवळ पिण्यापुरताच पाणी साठा उपलब्ध आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने करण्याची आवश्यकता दिसून येत आहे.
पाणीसाठ्याची अवस्था!
राज्यात मोठी, मध्यम आणि लहान आकाराची मिळून ३०२८ धरणे आहेत. या सर्व धरणांची मिळून एकूण पाणी साठवण क्षमता १७१५ टीएमसी इतकी आहे. मात्र आजघडीला सर्व धरणांमध्ये मिळून केवळ ३५३ टीएमसी एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. राज्यातील १४ कोटी जनतेला मिळून वर्षभर केवळ पिण्यासाठी आणि घरगुती वापरासाठी २७० टीमसी पाणी लागते. कडक उन्हाळ्यामुळे धरणातील पाण्याचे होणारे बाष्पीभवन विचारात घेतले तर सध्या धरणांमध्ये केवळ पिण्यापुरतेच पाणी शिल्लक आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कारण मान्सूनचे आगमन यंदा कधी होणार याचा मागमूस लागत नाही. शिवाय अल निनोच्या प्रभावामुळे यंदा दुष्काळाची चाहूलही वर्तविण्यात येत आहे. ही बाब विचारात घेता सध्या राज्यातील धरणांमध्ये असलेले पाणी वर्षभर केवळ घरगुती वापरासाठी जेमतेम पुरेल एवढेच आहे.
गेल्या वर्षी जादा साठा!
गेल्या वर्षी याच दिवसात राज्यातील धरणांमध्ये जवळपास ३१ टक्के पाणीसाठा होता. यंदा तो केवळ २४ टक्के इतकाच आहे. गेल्यावर्षी पाणीसाठा जादा असण्याचे कारण म्हणजे त्यावर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यभर मान्सूनपूर्व पावसाने थैमान घातले होते. यंदा मान्सूनपूर्व पावसानेही समाधानकारक हजेरी लावलेली नसल्याने धरणांमधील पाणीसाठा खालावल्याचे दिसत आहे.
कोकणात ३९ टीएमसी पाणी
सध्या कोकणात सर्वात कमी म्हणजे केवळ ३९ टीएमसी पाणी उपलब्ध आहे, तर पुणे विभागात सर्वाधिक म्हणजे ७७ टीमसी पाणी शिल्लक आहे. नागपूर विभागात ६०, अमरावती विभागात ५२, मराठवाड्यात ७०, नाशिक विभागामध्ये ५२ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. हा सगळा पाणी साठा केवल पिण्यापुरताच आहे. त्यामुळे आगामी काळात पाण्याचा वापर अतिशय काटकसरीनेच करावा लागणार आहे.
ही धरणे आहेत कोरडी...
राज्यातील एकूण १६ धरणे आज कोरडीठाक पडली आहेत. त्यामध्ये उजनीसह लोणावळा, घोड, पिंपळगाव जोगे, भाम, शिवनी, सिना-कोळेगाव, तागरखेडा, लिंबाळा, गुंजारगा, किनवट, सिद्धेश्वर, सिरसमार्ग, बोरगाव-अंजनपूर आणि खडकपूर्णा या धरणांचा समावेश आहे. अन्य काही धरणांमध्ये केवळ एक ते दहा टक्क्यांच्या आसपासच पाणी शिल्लक असलेले दिसते.