

कोल्हापूर ः शासनाने 2014 मध्ये सुरू केलेल्या ‘डायल 108’ या मोफत वैद्यकीय रुग्णवाहिकेचा राज्यातील 1 कोटी 6 लाख 34 हजार 326 रुग्णांना फायदा झाला आहे. यामध्ये सर्वाधिक संख्या गर्भवती, अपघातग्रस्त, हृदयविकारग्रस्तांची आहे. ही रुग्णवाहिका नागरिकांची जीवनदायिनीच ठरली आहे.
तत्कालीन आघाडी सरकारने ‘बीव्हीजी इंडिया’ या ग्रुपसोबत केलेल्या सामंजस्य करारानुसार जानेवारी 2014 पासून ‘डायल 108’ ही मोफत वैद्यकीय रुग्णवाहिका सेवा सुरू केली. रुग्णाने कोणत्याहीवेळी दूरध्वनीवर 108 या क्रमांकावर फोन केला, तर ग्रामीण भागात 30 मिनिटांत आणि शहरी भागात 20 मिनिटांत ही रुग्णवाहिका हजर होते. त्यानंतर रुग्णाला जवळच्या शासकीय किंवा खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येते. रस्ते अपघात, नैसर्गिक आपत्ती, हृदयविकार, अत्यवस्थ रुग्ण, भाजलेले, उंचावरून पडलेले, आत्महत्या, गर्भवती आदी 13 प्रकारच्या तातडीच्या रुग्णांना सेवा दिली जाते. जानेवारी 2014 ते जानेवारी 2025 पर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातील 4 लाख 45 हजार 794, तर राज्यात 1 कोटी 6 लाख 34 हजार 326 रुग्णांना याचा फायदा झाला आहे.
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात प्राथमिक उपचारांची सुविधा असलेल्या 704, तर अद्ययावत उपकरणे असलेल्या 233 अशा एकूण 937 रुग्णवाहिका सेवेत आहेत. त्यापैकी कोल्हापूर जिल्ह्यात 28 मूलभूत आणि 8 अद्ययावत अशा 36 रुग्णवाहिका आहेत. या रुग्णवाहिका प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा शासकीय रुग्णालय, महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये उपलब्ध आहेत.
राज्यातील जनतेला आपत्कालीन परिस्थितीत मार्चपासून हेलिकॉप्टर रुग्णवाहिकेची सुविधा मिळणार आहे. सुरुवातीला तीन हेलिकॉप्टर अॅम्ब्युलन्स उपलब्ध केल्या जातील. ही सेवा शासनाच्या आपत्कालीन वैद्यकीय सेवा 108 अंतर्गत मिळणार असून ती विनामूल्य असेल. ही सुविधा समुद्रापासून ते रस्त्यापर्यंत मिळेल.