

कोल्हापूर : धार्मिक महत्त्व असलेल्या आणि लाखो भाविकांची गर्दी होणार्या करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिराचे सुरक्षाकवच भक्कम आहे का, असा प्रश्न पडावा इतकी मंदिराच्या सुरक्षा यंत्रणेत ढिलाई आली आहे. मंदिराच्या मुख्य दर्शन प्रवेशद्वारासह घाटी दरवाजातील मेटल डिटेक्टर यंत्रणा बंद असणे, इलेक्ट्रिक रूमचे काम पत्र्याच्या शेडमधून करणे, मंदिराच्या प्रवेशद्वारापर्यंत परिसरातील काही दुकानदार व बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांच्या दुचाकी पार्किंग करणे यामुळे मंदिर सुरक्षेसंदर्भातील निकषांचा विसर पडला आहे. अंबाबाई मंदिराची वार्षिक सुरक्षा तपासणी नुकतीच केंद्र व राज्याच्या गुप्तचर तपास पथकाच्या वतीने करण्यात आली. यावेळी मंदिर सुरक्षेला धक्का पोहोचवणार्या काही बाबी अधोरेखित झाल्या.
भाविकांकडे असलेल्या पर्स, छोट्या बॅग स्कॅन करण्यासाठी चारही प्रवेशद्वारांवर बॅगस्कॅनर यंंत्रणा आहे; मात्र गेल्या 15 दिवसांपासून ही यंत्रणाच बंद आहे. प्रवेशद्वारावरील बॅग स्कॅनरयंत्रणेमुळे भाविकांच्या बॅगेत आक्षेपार्ह वस्तू असल्यास तसा सिग्नल दिला जातो; मात्र सध्या सुरू असलेल्या पाहणीमुळे सुरक्षारक्षकांकरवी पर्स किंवा बॅग फक्त उघडून त्यावर नजर टाकली जाते. बंद असलेल्या बॅगस्कॅनर यंत्रणा व मेटल डिटेक्टर दरवाजांचा गैरफायदा घेऊन मंदिरात संशयास्पद वस्तू ठेवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मंदिर सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
अंबाबाई मंदिराच्या उत्तरेला असलेल्या घाटी दरवाजा परिसरातील प्रवेशद्वारापर्यंत काही फूल विक्रेते, ओटी साहित्य विक्रेते, बंदोबस्तासाठी असलेले पोलिस यांची वाहने काशी विश्वेश्वर मंदिर, कार्तिकस्वामी मंदिर भिंतीलगत उभी केली जातात. तसेच दक्षिण प्रवेशद्वारासमोर सरलष्कर भवनलगतच्या जागेतही पार्किंग केलेल्या दुचाकींची रांग असते. सुरक्षेच्या द़ृष्टीने मंदिर परिसर रिकामा असणे आवश्यक असूनही या बेकायदेशीर पार्किंगकडे दुर्लक्ष केले जाते.