

कोल्हापूर : बहुतेक सर्व लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ सनदी अधिकारी ज्या प्रतिष्ठेच्या महालक्ष्मी एक्स्प्रेसने प्रवास करतात, त्याची उपेक्षा सुरू आहे. छत्रपती शाहू महाराज टर्मिनस हे मध्य रेल्वेकडे असताना नेमकी प्रतिष्ठेची गाडी दक्षिण मध्य रेल्वेकडे आहे. या एक्स्प्रेसवर मराठीत नामफलकही नाही. मराठीची उपेक्षा होत असताना लोकप्रतिनिधींचे संपूर्णपणे दुर्लक्ष आहे. कोल्हापूर - मुंबई ही महालक्ष्मी एक्स्प्रेस मध्य रेल्वे विभागाची असावी आणि त्याची प्रतिष्ठा जपली जावी, त्याचबरोबर त्यावर मराठीत फलक असावा, अशी मागणी होत आहे.
कोल्हापूर-मुंबईचे ब—ॉडगेजमध्ये रूपांतर झाल्यानंतर समारंभपूर्वक महालक्ष्मी एक्स्प्रेस सुरू करण्यात आली. तेव्हाच्या कोल्हापूर नगरपालिकेने मिरवणुकीने अंबाबाईचा फोटो या एक्स्प्रेसवर नेऊन लावला होता. असे भावनिक महत्त्व या एक्स्प्रेसला आहे; मात्र आज त्यावर मराठीत फलक नाही.मुंबईहून कोल्हापुरात येणारी महालक्ष्मी कोल्हापुरातून तिरुपतीला हरिप्रिया एक्स्प्रेस म्हणून जाणार. तिरुपतीमध्ये या एक्स्प्रेसची देखभाल दुरुस्ती होणार. तिरुपतीहून निघालेली हरिप्रिया एक्स्प्रेस कोल्हापुरात येऊन मुंबईला महालक्ष्मी एक्स्प्रेस म्हणून जाणार. या काळात केवळ वॉटरिंग आणि क्लिनिंग होत असल्याने कधीतरी गंभीर परिणाम होऊ शकतात. अलीकडेच रुकडी स्थानकानजीक या एक्स्प्रेसच्या बोगीच्या खाली आग लागली, हे थोडक्यात निभावले. पुढचा अनर्थ टाळण्यासाठी यावर उपाययोजना करण्याची गरज आहे.
कोयना एक्स्प्रेस, महाराष्ट्र एक्स्प्रेस, हजरत निजामुद्दीन, अहमदाबाद एक्स्प्रेस, कलबुर्गी, कोल्हापूर - पुणे वंदे भारत, नागपूर एक्स्प्रेस या कोल्हापुरातून सुटणार्या सर्व एक्स्प्रेसवर मराठीत नामफलक असताना महालक्ष्मी एक्स्प्रेसवर मराठीत नामफलक का नाही? महालक्ष्मी एक्स्प्रेसवर कोल्हापूर - मुंबई - कोल्हापूर केवळ असा उल्लेख मराठीत आहे.