

कोल्हापूर : कोल्हापुरातील टेंबलाई टेकडी परिसरात असणार्या 109 टी. ए. बटालियन परिसरातील ‘द टेरिअर आर्मी एन्व्हायर्न्मेंटल पार्क’ आणि ‘ट्रेनिंग एरिया गोल्फ’ कोर्सवर पश्चिम भारतातील प्रतिष्ठेच्या महालक्ष्मी कप खुल्या गोल्फ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा ही स्पर्धा रविवार, दि. 2 मार्च रोजी होणार असून, सकाळच्या सत्रात विविध प्रकारांत या स्पर्धेची चुरस पाहायला मिळणार आहे.
109 टी. ए. बाटालियनचे विद्यमान पॅट्रॉन कर्नल बी. के. कल्लोली, गोल्फ कॅप्टन कर्नल (निवृत्त) अमरसिंह सावंत आणि सुभेदार बसवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. स्पर्धेसाठी गोल्फ कोर्स सज्ज झाला असून कोल्हापूर, बेळगाव, हुबळी येथील नामवंत गोल्फर्सनी सहभाग नोंदविला आहे.
109 टी. ए. बटालियनच्या टेंबलाई टेकडी परिसरातील ‘द टेरिअर आर्मी एन्व्हायर्न्मेंटल पार्क’ आणि ‘ट्रेनिंग एरिया गोल्फ’ कोर्सच्या स्थापनेचे यंदा 51 वे वर्ष आहे. सुवर्णमहोत्सवी वाटचालीचा साक्षीदार असणार्या या कोर्सवर अनेक महत्त्वाच्या स्पर्धा झाल्या. यात देशभरातील खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून गोल्फ प्रेमींची मने जिंकली. या गोल्फ कोर्ससाठी बटालियनच्या आजपर्यंतच्या सर्व कमांडिंग ऑफिसरांनी मोलाचे योगदान दिले आहे.
सन 1974 मध्ये लेफ्टनंट जनरल पद्मश्री एसपीपी थोरात यांच्या सूचनेनुसार या गोल्फ कोर्सचे डिझाईन लेफ्टनंट कर्नल जे. पी. टॉरफी (व्हीएसएम) यांनी केले. यासाठी तत्कालीन छत्रपती शहाजी महाराज (केसीआयई, जीसीएस, बीए, एडीसी, महाराजा ऑफ कोल्हापूर) यांचे मार्गदर्शन लाभले. गोल्फ कोर्सचे उद्घाटन दि. 2 जानेवारी 1976 रोजी मेजर जनरल छत्रपती शहाजी महाराज यांच्या हस्ते झाले. महाराजांनी रेड बॉल टोलवून गोल्फ कोर्सचे उद्घाटन केल्याचा उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रात आहे. पुढे गोल्फप्रेमी बाळ घाटगे व त्यांच्या सहकार्यांच्या मदतीने या गोल्फ कोर्समध्ये विविध सुधारणा केल्या. यासाठी त्यांना कुमार शिरगावकर, वसंतराव घाटगे, जयकुमार पाटील आदींचे सहकार्य लाभले. सन 1990 पासून कर्नल विजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली गोल्फ कोर्सवर महालक्ष्मी कप स्पर्धेची सुरुवात झाली. स्पर्धेसाठीचा फिरता रौप्य चषक खासदार शाहू महाराज यांच्याकडून देण्यात आला आहे.
गोल्फ खेळाचा उगम इ.स.वी. सनाच्या 14 व्या शतकात स्कॉटलंडमध्ये झाला. अल्पावधीत या खेळाला लोकप्रियता मिळाली. गोल्फ खेळाची पहिली स्पर्धा ब्रिटिश ओपन इ.स.वी. सन 1860 मध्ये झाली. अमेरिकेत गोल्फची सुरुवात सन 1887 मध्ये जॉन जी. रीड या स्कॉटलंडच्या व्यक्तीने केली. भारतात गोल्फ खेळ 20 व्या शतकापासून खेळला जाऊ लागला. सन 1929 कोलकाता येथे ‘रॉयल गोल्फ क्लब’ची स्थापना झाली.
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा राज्यारोहण सोहळा दि. 2 एप्रिल 1894 रोजी झाला. छत्रपती म्हणून त्यांनी करवीर राज्याची जबाबदारी स्वीकारली. या ऐतिहासिक सोहळ्यानिमित्त इतर विविध सांस्कृतिक कला उपक्रम, क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यात दोन दिवसीय गोल्फ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ताराबाई पार्कमधील रेसिडेन्सी क्लब परिसरात गोल्फ कोर्स होते. सोमवार, दि. 2 ते बुधवार, दि. 4 एप्रिल 1894 या कालावधीत झालेल्या स्पर्धेची शंभर वर्षांपूर्वीची पत्रिका आजही ऐतिहासिक संग्रहात पाहायला मिळते.