

कोल्हापूर : अमल महाडिक आमदार असताना त्यांनी कोल्हापूर दक्षिणमधील 9 हजारांहून अधिक गोरगरिबांच्या संजय गांधी, श्रावणबाळ योजनेच्या पेन्शन बंद पाडल्या आणि आता ते लाडक्या बहिणींची पोस्टर्स गावोगावी लावत सुटले आहेत. गरिबांच्या चुलीत पाणी ओतणार्या या महाडिक कंपनीला तुमच्या दारात आल्यावर याचा जाब विचारा, असे प्रतिपादन मार्केट कमिटीचे संचालक सुयोग वाडकर यांनी केले. आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ खेबवडे (ता. करवीर) येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी आमदार ऋतुराज पाटील यांची उपस्थिती होती. वाडकर पुढे म्हणाले, माजी आमदार अमल महाडिक यांनी नेहमीच भोळेपणाचा आव आणला आहे. पाच वर्षे त्यांनी कोणती कामे केली, याचा हिशेब त्यांनी जनतेला द्यावा. आजपर्यंत स्वतः कुठलीही संस्था न काढणार्या महाडिकांनी दुसर्यांनी काढलेल्या संस्था घशात घातल्या. आमदार ऋतुराज पाटील म्हणाले, समाजकारणातून सेवा करणे, हाच माझा ध्यास आहे. मतदारसंघात सर्वांना सोबत घेऊन विकासकामे केल्याचे मला समाधान आहे. विकासकामांची ही गती पुढे सुरू ठेवण्यासाठी 20 नोव्हेंबरला सर्वांनी मला साथ द्या.
जयप्रकाश पाटील म्हणाले, तळमळीने काम करणार्या आमदार ऋतुराज पाटील यांना या निवडणुकीत विजयी करूया. आनंदा कुंभार म्हणाले, सर्वसामान्य कुटुंबातील मुले शिकली पाहिजेत, मोठ्या पदावर पोहोचली पाहिजेत, यासाठी आ. ऋतुराज पाटील यांनी अभ्यासिका बांधल्यामुळे तरुणांचे चांगल्या करिअरचे स्वप्न साकार होईल. चुयेच्या माजी सरपंच राजश्री कांबळे, सी. बी. चौगले यांनी मनोगत व्यक्त केले. सभेत करवीर तालुका लालबावटा कामगार संघटनेने आमदार ऋतुराज पाटील यांना पाठिंबा दिला. सभेला गोकुळ संचालक शशिकांत पाटील-चुयेकर, सरपंच किरण चौगले, उपसरपंच प्रेमा पाटील, एकनाथ पाटील, आर. एस. कांबळे, सुभाष वाडकर, एस. बी. पाटील, चंदर पाटील, डी. वाय. पाटील, विजय वडिंगेकर, कुमार साबळे, के. डी. शिंदे, एम. बी. वडिंगेकर, शिवाजी साखरे, विश्वास दिंडोर्ले, बिरदेव डोणे आदी उपस्थित होते.