

कोल्हापूर : जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या वतीनेही जागा वाटपाच्या हालचाली गतिमान केल्या आहेत. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील महाविकास आघाडीतील घटक पक्षातील नेत्यांशी चर्चा करत आहेत. आतापर्यंत शिरोळ व हातकणंगले तालुक्यातील जागा वाटप जवळपास ठरले आहे. याठिकाणी काँग्रेस, ठाकरे शिवसेना व स्वाभिमानी शेतकरी संघटना एकत्र लढणार आहे. करवीर तालुक्यातील चर्चा देखील अंतिम टप्प्यात आली आहे.
महानगरपलिकेच्या निवडणुकीत काँग्रेसला चांगले यश मिळाले आहे. त्यामुळे काँग्रसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीची तयारी आता सर्वच राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. यामध्ये जागा वाटपाची चर्चा महत्त्वाची आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांनी प्रथम तालुक्यातील काँग्रेसच्या पदाधिकार्यांशी चर्चा केली . त्यांची मते जाणून घेतली. यामध्ये जे येतील त्यांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका कार्यकर्त्यांनी मांडली. त्यानुसार आमदार पाटील आता महाविकास आघाडीच्या नेत्यांशी चर्चा करू लागले आहेत.
हातकणंगले तालुका जिल्ह्यात मोठा तालुका आहे. या तालक्यातून जिल्हा परिषदेचे 11 आणि पंचायत समितीचे 22 सदस्य निवडून येत असतात. त्यामुळे पाटील यांनी प्रथम या तालुक्यातील आणि त्याला लागून असलेल्या शिरोळ तालुक्यातील नेत्यांशी चर्चा केली. या दोन तालुक्यामध्ये एकत्र येण्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी तसेच शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांनी अनुकूलता दर्शविली आहे.
जिल्हा परिषदेतील सत्ता ठरविणार्या तालुक्यांपैकी करवीर तालुका देखील महत्त्वाचा आहे. या तालुक्यातून सर्वाधिक 12 सदस्य निवडून येत असतात. या तालुक्यातील जागा वाटपाबाबत काँग्रेस व शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरू असून ती अंतिम टप्प्यात आल्याचे सांगण्यात येते. राधानगगरी, भुदरगड, आजरा, चंदगड, शाहूवाडी व पन्हाळा तालुक्यातील जागांबाबत चर्चा सुरू असून या तालुक्यातील जागा वाटपावरही दोन दिवसात शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.