

व्यावसायिक एलपीजी गॅसचा पुरवठा कमी
पाव, ब्रेड व इतर बेकरी पदार्थांचे उत्पादन घटले
काही बेकरींनी नवीन ऑर्डर घेणे बंद केले
इलेक्ट्रिक ओव्हन किंवा लाकडी भट्टी हा खर्चिक पर्याय
बेकरींसह हॉटेल व लहान खाद्य व्यवसायांवर परिणाम
बिरू व्हसपटे
शिरढोण : शिरोळ तालुक्यात सध्या व्यावसायिक एलपीजी गॅसच्या टंचाईचा फटका लहान बेकरी व्यावसायिकांना बसत असून अनेक बेकरींचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. गॅस सिलिंडरचा पुरवठा अनियमित झाल्यामुळे काही बेकरींमध्ये कामकाज मर्यादित स्वरूपात सुरू आहे, तर काही ठिकाणी उत्पादन बंद पडण्याची वेळ आली आहे.
तालुक्यातील बहुतांश बेकरी व्यवसाय पूर्णपणे गॅसवर अवलंबून असल्यामुळे गॅस टंचाईचा थेट परिणाम पाव, ब्रेड, बन, केक आदी बेकरी पदार्थांच्या उत्पादनावर होत आहे. दररोज मोठ्या प्रमाणात तयार होणाऱ्या या पदार्थांचे उत्पादन कमी झाल्याने बाजारपेठेतही त्याची कमतरता जाणवू लागली आहे. काही बेकरी चालकांना ग्राहकांच्या ऑर्डर रद्द कराव्या लागत असून त्यामुळे आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे.
गॅस उपलब्धतेच्या समस्येमुळे बेकरी चालकांचे आर्थिक गणित बिघडले आहे. उत्पादन घटल्याने कामगारांनाही कमी काम मिळत असून त्यांच्यावरही याचा परिणाम होत आहे. काही व्यावसायिक पर्याय म्हणून इलेक्ट्रिक ओव्हन किंवा पारंपारिक लाकडी भट्टीचा वापर करण्याचा विचार करत आहेत; मात्र त्यासाठी मोठी गुंतवणूक आवश्यक असल्याने सर्वांसाठी हा पर्याय शक्य होत नाही.
दरम्यान, गॅस टंचाईचा परिणाम केवळ बेकरी व्यवसायापुरता मर्यादित न राहता हॉटेल, चहाचे स्टॉल, वडापाव गाड्या तसेच इतर लहान खाद्य व्यवसायांवरही होत आहे. त्यामुळे व्यावसायिक एलपीजी गॅसचा पुरवठा तातडीने सुरळीत करावा, अशी मागणी शिरोळ तालुक्यातील बेकरी व्यावसायिकांकडून करण्यात येत आहे