

कोल्हापूर : प्रेमाला नकार दिल्याने संतापलेल्या तरुणाने अल्पवयीन मुलाला दोन हजारांची सुपारी देऊन तरुणीच्या मोपेडवर पेट्रोल ओतून पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार जुना राजवाडा पोलिसांच्या चौकशीत उघडकीस आला. पोलिसांनी वैभव शहाजी कुरणे (वय 27, रा. वारे वसाहत, कोल्हापूर) याला अटक केली. न्यायालयाने त्यास पोलिस कोठडी दिली.
टिंबर मार्केट परिसरात दि.6 डिसेंबरला ही घटना घडली होती. संबंधित मोपेड मालकाने याप्रकरणी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात अनोळखीविरुद्ध फिर्याद दाखल केली होती. पोलिस निरीक्षक किरण लोंढे, गुन्हे प्रगटीकरण पथकाने या घटनेची दखल घेत परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली.
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर हा प्रकार उघड झाला. संशयित वैभव कुरणे याचे एका तरुणीवर एकतर्फी प्रेम होते. संबंधित तरुणीने त्याच्या प्रस्तावाला नकार दिलाच. शिवाय छेडछाडीचा प्रकार झाल्यास तक्रार करेन, असा दम भरला. या प्रकाराने संतापलेल्या तरुणाने अल्पवयीन मुलाला दोन हजारांची सुपारी दिली.
दोन हजारासह पेट्रोलची बाटली, आगपेटी देऊन काही अंतरावरून मुलाला मोपेड दाखविली. मुलाने मोपेडच्या सिटवर पेट्रोल टाकून पेटवून दिली. या घटनेची पोलिसांनी दखल घेत छडा लावण्याचा निर्धार केला. संबंधित मुलाला ताब्यात घेतल्यानंतर वैभव कुरणे याच्या कारनाम्याची भांडाफोड झाली. पोलिसांनी त्यास अटक केली.