दीर्घकाळ टिकणारी सोडियम आयन बॅटरी विकसित

भारतीय शास्त्रज्ञांचे यश; जागतिक वाहन उद्योगाचा चेहरा बदलणार
long-lasting-sodium-ion-battery-developed
दीर्घकाळ टिकणारी सोडियम आयन बॅटरी विकसित Pudhari File Photo
Published on
Updated on
राजेंद्र जोशी

कोल्हापूर : जगात प्रदूषणाची मात्रा आणि इंधनावरील खर्ची पडणार्‍या परकीय चलनाचा बोजा कमी करण्यासाठी शुद्ध विजेला प्राधान्य देण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांचा पुरस्कार केला जात असला तरी विजेवर चालणार्‍या गाड्यांच्या बॅटरीसाठी लिथियमची कमतरता आहे. त्याची किंमत अधिक आहे. शिवाय त्याला मर्यादाही आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय संशोधकांनी एक दमदार पाऊल टाकले आहे. त्यांनी जलद चार्जिंग आणि दीर्घकाळ टिकणारी सोडियम आयन बॅटरी विकसित केली आहे. ही बॅटरी जगातील इलेक्ट्रिक वाहन उद्योगाचा चेहरामोहरा बदलू शकते.

बंगळूर येथील जवाहरलाल नेहरू सेंटर फॉर अ‍ॅडव्हान्सड् सायंटिफिक रिसर्च या केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या अंतर्गत येणार्‍या संस्थेतील प्रा. प्रेमकुमार सेगुट्टवन आणि त्यांचा पीएच.डी. स्नातक बिप्लव पात्रा यांच्या नेतृत्वाखाली तरुण संशोधकांच्या एका पथकाने ही महत्त्वाची कामगिरी केली आहे. देशाच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने ही बहुमोल भेट समजली जाते. भारतीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाने नुकतीच त्याची घोषणा केली आहे. सोडियम आयन बॅटरीसाठी संशोधकांच्या या पथकाने नॅसिकॉन प्रकारातील कॅथोड व अ‍ॅनोडचा वापर करीत ही बॅटरी विकसित केली आहे. ही नवी बॅटरी अवघ्या सहा मिनिटांत 80 टक्क्यांवर चार्ज होते आणि तीन हजारपेक्षा चार्ज सायकल सहजपणे पार करते.

जागतिक वाहन उद्योगात गेल्या दशकात दाखल झालेल्या इलेक्ट्रिक वाहनांना बॅटरीसाठी लिथियमची उपलब्धता ही मोठी समस्या होती. लिथियमचे साठे मर्यादित आहेत. त्याची उपलब्धता कमी आणि किंमतही मोठी होती. यामुळे लिथियमसाठी आयातीवर अवलंबून राहणे भाग पडत होते. याउलट भारतात सोडियम मुबलक प्रमाणात आहे. या सोडियम आयन बॅटर्‍यांचा वापर केवळ इलेक्ट्रॉनिक वाहने, सौर ऊर्जा ग्रीडस् आणि ड्रोनपुरता मर्यादित न राहता ग्रामीण भागातही स्वच्छ आणि सुरक्षित ऊर्जेचा पर्याय उपलब्ध करता येणे शक्य आहे. या नव्या तंत्रज्ञानाची कसून चाचणी केली असून इलेक्ट्रो केमिकल सायकलिंगपासून ते क्वांटम सिम्युलेशनपर्यंत आधुनिक पद्धती वापरल्या आहेत. झपाट्याने चार्ज होणारी आणि पारंपरिक बॅटर्‍यांमध्ये दिसणारे आधीचे व कार्यक्षमतेचे धोके टाळणारी ही बॅटरी ऊर्जा क्षेत्रात क्रांती घडवू शकते, असा दावा भारतीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाने केला आहे.

सुरक्षितपणे हालचाल

बाजारामध्ये सोडियम आयन बॅटरी उपलब्ध आहे. पण तिचा चार्जिंगचा वेग कमी आणि कार्यकाळही अल्प होता. यावर मात करण्यासाठी संशोधकांनी नव्या तंत्रज्ञानाचा आधार घेतला. यामध्ये रसायनशास्त्र व नॅनो तंत्रज्ञानाचा उत्तम मिलाफ घडवला आहे. खरे तर या संशोधनात विद्युत प्रवाह सुरळीत होण्यासाठी आवश्यक अ‍ॅनोडच्या साहित्यात तीन महत्त्वाचे बदल केले आहेत. कणांचे आकार नॅनोस्तरावर आणले. त्याला अत्यंत सूक्ष्म अशा कार्बन लेअरमध्ये गुंडाळले गेले आणि थोड्या अ‍ॅल्युमिनियमचा वापर करून अ‍ॅनोड सुधारला. या बदलाने सोडियम आयन जलद आणि सुरक्षितपणे हालचाल करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news