मराठी वृत्तपत्र उद्योग वाचविण्यासाठी पुढाकार घ्या; लोकमतचे डॉ. विजय दर्डा यांची ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांना विनंती

कोल्हापूर : लोकमतच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन डॉ. विजय दर्डा यांच्याशी चर्चा करताना ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव.
कोल्हापूर : लोकमतच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन डॉ. विजय दर्डा यांच्याशी चर्चा करताना ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव.
Published on
Updated on

कोल्हापूर : अमेरिका-इस्रायल-इराण यांच्यातील युद्धामुळे देशात मोठे संकट निर्माण झाले आहे. कागदाचे दर प्रचंड वाढले असून इतर कच्च्या मालाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. वृत्तपत्र व्यवसाय चालविणे कठीण होत आहे. यातून सावरण्यासाठी आणि मराठी वृत्तपत्र उद्योगाला संकटातून बाहेर काढण्यासाठी पुढाकार घ्या, अशी विनंती लोकमतच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन डॉ. विजय दर्डा यांनी दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांना शनिवारी (दि. 28) केली.

कोल्हापूर ः दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांचा सहस्रचंद्रदर्शन सोहळ्यानिमित्त शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करताना लोकमतच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन डॉ. विजय दर्डा. शेजारी ‘पुढारी’चे समूह सरव्यवस्थापक अनिल पाटील, लोकमतचे सहायक उपाध्यक्ष मकरंद देशमुख, कार्यकारी संपादक सचिन जवळकोटे, विश्वास पाटील, संतोष साखरे, संजय पाटील, चंद्रकांत कित्तुरे आदी.
कोल्हापूर ः दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांचा सहस्रचंद्रदर्शन सोहळ्यानिमित्त शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करताना लोकमतच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन डॉ. विजय दर्डा. शेजारी ‘पुढारी’चे समूह सरव्यवस्थापक अनिल पाटील, लोकमतचे सहायक उपाध्यक्ष मकरंद देशमुख, कार्यकारी संपादक सचिन जवळकोटे, विश्वास पाटील, संतोष साखरे, संजय पाटील, चंद्रकांत कित्तुरे आदी. (छाया ः पप्पू अत्तार)

डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या सहस्रचंद्रदर्शन सोहळ्याला येता आले नाही म्हणून डॉ. दर्डा यांनी भाऊसिंगजी रोडवरील ‘पुढारी भवन’ येथे डॉ. जाधव यांची भेट घेऊन शाल, पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. त्यानंतर डॉ. जाधव यांच्याशी युद्धामुळे वृत्तपत्र चालविणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करण्याची गरज आहे, असे सांगून देशभर होत असलेल्या विविध घडामोडींवर चर्चा केली.

यावेळी दै. ‘पुढारी’चे समूह सरव्यवस्थापक अनिल पाटील, लोकमतचे सहायक उपाध्यक्ष मकरंद देशमुख, कार्यकारी संपादक सचिन जवळकोटे, उपवृत्त संपादक विश्वास पाटील, एच. आर. व्यवस्थापक संतोष साखरे, वितरण व्यवस्थापक संजय पाटील, चंद्रकांत कित्तुरे आदी उपस्थित होते. वृत्तपत्राच्या किमती सात-आठ वर्षांपूर्वी होत्या तेवढ्याच आजही असल्याचे सांगून डॉ. दर्डा म्हणाले, वर्षागणिक वृत्तपत्राचा कागद महाग होत आहे. आता तर युद्धामुळे वृत्तपत्र व्यवसाय अडचणीत आहे, तरीही वृत्तपत्रांच्या किमतीत वाढ झालेली नाही. सर्व वृत्तपत्रांच्या मालकांना एकत्रित करून कागदासह इतर साहित्य मिळण्यासाठी आणि वृत्तपत्र व्यवसायाचे प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय स्तरावर पाठपुरावा करण्याची विनंतीही डॉ. जाधव यांना त्यांनी केली. यावेळी डॉ. जाधव यांनी कागदाचा दर टनाला 70 ते 80 हजार रुपये झाल्याचे सांगून तरीही कागद मिळत नसल्याचे सांगितले.

प्रतापसिंह जाधव ज्येष्ठ अन् श्रेष्ठ

डॉ. दर्डा यांनी डॉ. जाधव यांची गळाभेट घेऊन ‘बाळासाहेब की जय हो’ असे गौरवोद्गार काढले. ‘पुढारी भवन’मध्ये झालेली ही भेट औपचारिकतेच्या चौकटीपलीकडे जाऊन एका भावनिक संवादात रूपांतरित झाली.

‘सहस्रचंद्रदर्शन सोहळ्याच्या प्रचंड गर्दीत आपल्याला मनसोक्त भेटता आले नसते. त्यामुळे मी कार्यक्रमाला आलो नाही’, असे दर्डा म्हणाले. ‘तुम्ही फक्त वयाने नाही, तर अनुभवाने आणि कार्यानेही आमच्यासाठी ज्येष्ठ आणि श्रेष्ठ आहात’, असे म्हणत डॉ. दर्डा यांनी डॉ. जाधव यांच्याविषयी आदर व्यक्त केला. डॉ. दर्डा यांनी डॉ. प्रतापसिंह जाधव यांना, तुम्हाला भेटून खूप बरे वाटले. वयाच्या 80 व्या वर्षीही तुम्ही एवढे तंदुरुस्त कसे राहता, याची उत्सुकता व्यक्त करून दिनक्रम विचारून घेतला. त्यावेळी डॉ. जाधव यांनी मी सतत कामात राहतो, असे साधे पण प्रभावी उत्तर दिले. याच संवादावेळी डॉ. दर्डा यांनी ‘पुढारी’चे चेअरमन डॉ. योगेश जाधव यांनाही मी डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्याकडून जीवनशैलीचा कानमंत्र घ्यावा, असा सल्ला देत असल्याचेही सांगितले. या संवादातून दोन्ही ज्येष्ठ व्यक्तिमत्त्वांमधील आपुलकी आणि स्नेह स्पष्टपणे जाणवत होता.

बाळासाहेबांचे काम फार जबरदस्त

दरम्यान, डॉ. जाधव यांच्या ‘सिंहायन’ या आत्मचरित्राची चर्चा रंगली. डॉ. जाधव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मराठीतील ‘सिंहायन’ आत्मचरित्राचे प्रकाशन झाल्याचे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आत्मचरित्र मागवून घेतल्याचे सांगितले. तसेच पंतप्रधान मोदी यांनी दिल्लीत पंतप्रधान कार्यालयात ‘सिंहायन’ या हिंदी आवृत्तीचे प्रकाशन करू, अशी ग्वाही दिली आहे. त्यानुसार त्यांनी स्वतः पुढाकार घेत दिल्लीतील एका प्रकाशन संस्थेला हिंदीत भाषांतर करण्यास सांगितले. तसेच इंग्रजीतही भाषांतरित होत आहे. दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हिंदी भाषांतरित ‘सिंहायन’ आत्मचरित्राचे प्रकाशन होणार असल्याचे सांगताच श्री. दर्डा यांनी बाळासाहेबांचे काम फार जबरदस्त असते, असे कौतुकपूर्ण उद्गार काढून अभिनंदन केले.

डॉ. प्रतापसिंह जाधव यांना पद्मविभूषण मिळावा

डॉ. जाधव यांच्या कार्यालयातील भिंतीवर लावलेले विविध ऐतिहासिक क्षणांचे फोटो पाहताना दोघेही जुन्या आठवणींत रममाण झाले. कोणता फोटो, कोणत्या प्रसंगाचा याची माहिती डॉ. जाधव यांनी दिली. यात सियाचीन हॉस्पिटली उभारणी, डॉ. प्रतापसिंह जाधव यांना मिळालेल्या पद्मश्री पुरस्कारापासून ते दै. ‘पुढारी’च्या 75 व्या वर्धापनदिनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी कोल्हापुरात आले होते, त्या फोटोंचाही समावेश होता. पुरस्कारांचा प्रवास पाहून डॉ. दर्डा भारावून गेले. यावेळी डॉ. दर्डा यांनी डॉ. जाधव यांना 2003 ला तुम्हाला पद्मश्री पुरस्कार मिळाला. आता पद्मविभूषण मिळायला हवा, अशी मनापासूनची सदिच्छा व्यक्त केली.

डॉ. जाधव यांचे आत्मचरित्र प्रेरणादायी

डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी डॉ. विजय दर्डा यांना ‘सिंहायन’ हे आपले आत्मचरित्र भेट दिले. त्याचवेळी डॉ. दर्डा यांनी नुसते आत्मचरित्र भेट नको, तर त्यावर संदेश हवा अशी आग्रही विनंती केली. तुमचे हे आत्मचरित्र आमच्यासाठी प्रेरणादायी आहे, असे गौरवोद्गारही डॉ. दर्डा यांनी काढले. ही भेट केवळ दोन संपादकांची नव्हती, तर मराठी पत्रकारितेच्या दोन पिढ्यांचा संवाद होता. उद्योगाच्या अडचणी, वैयक्तिक आठवणी आणि भविष्याचा विचार या सगळ्यांचा संगम या भेटीत दिसून आला. ‘पुढारी’ कार्यालयातून बाहेर पडताना डॉ. दर्डा यांनी डॉ. जाधव यांना, ‘साहेब... काळजी घ्या!’ असेही आपुलकीने सांगितले. त्या एका वाक्यात त्यांच्या मनातील जिव्हाळा, आदर आणि स्नेह दडलेला होता.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news