

कोल्हापूर : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती प्रतिवर्षीप्रमाणे दि. 26 जून रोजी मोठ्या दिमाखात साजरी होत आहे. यानिमित्त शाहूप्रेमी संस्था-संघटनांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
शाहू जयंती सोहळ्याची जय्यत तयारी जिल्हा व महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे. ठिकठिकाणची शाहू स्मारके व पुतळे आकर्षक विद्युत रोषणाईने सजविण्यात आली आहेत. दसरा चौक, शाहू जन्मस्थळ लक्ष्मी विलास पॅलेस, शाहू समाधिस्थळांसह संपूर्ण जिल्हाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राजर्षी शाहू स्मारक ट्रस्टतर्फे सकाळी 8 वाजता दसरा चौकातील राजर्षी शाहू स्मारकाला अभिवादन करण्यात येणार आहे. तसेच छत्रपती चॅरिटेबल देवस्थान ट्रस्टच्या वतीने जुना राजवाडा येथे विविध कार्यक्रम होणार आहेत.
भारतीय शेतकरी कामगार पक्षातर्फे सकाळी साडेदहा वाजता, टेंबे रोडवरील कार्यालयात शिवशाहीर रंगराव पाटील यांचा शाहिरी पोवाड्याचा कार्यक्रम होईल. कवी युवराज पाटील यांचे व्याख्यान होणार आहे.
वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने वृक्षारोपण व प्रतिमा पूजन होणार असल्याची माहिती वीरशैव समाजाचे अध्यक्ष किरण सांगावकर व सचिव सुनील गाताडे यांनी दिली. सकाळी 11 वाजता सिद्धार्थनगर परिसरातील वीरशैव लिंगायत रुद्र भूमी येथे हा कार्यक्रम होईल.
बहुजन समाज पक्ष, पश्चिम विभागाच्या वतीने शाहूपुरी येथील आयर्विन सभागृहात मुख्य सोहळा होणार आहे. सकाळी 9 वाजता बिंदू चौक येथील महात्मा जोतिराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना अभिवादन, बिंदू चौकातून मिरवणूक, साडेदहा वाजता दसरा चौकातील शाहू महाराजांच्या पुतळ्याजवळ मर्दानी खेळ यासह शहरातील विविध ऐतिहासिक स्थळांवर लाडू वाटप होणार आहे.
कसबा बावडा : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 151 व्या जयंतीनिमित्त कसबा बावडा येथील लक्ष्मी विलास पॅलेस या शाहू जन्मस्थळी गुरुवारी सकाळी 8 वाजता अभिवादन कार्यक्रम होणार आहे.
या कार्यक्रमाला पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती असणार आहे. जन्मस्थळ विद्युत रोषणाईने उजळून निघाले आहे. जन्मस्थळाच्या परिसरात फुलांची आरास करण्यात आली आहे. शॉर्ट फिल्म दाखवण्यासाठी 30 आसन क्षमतेचे छोटे थिएटर तयार केले आहे. याची ट्रायल बुधवारी सायंकाळी घेण्यात आली. या थिएटरचे लोकार्पण होणार आहे. सायंकाळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी जन्मस्थळी भेट देऊन माहिती घेतली.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिवस दि. 26 जून सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त प्रतिवर्षीप्रमाणे समता दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी सकाळी साडेआठ वाजता दसरा चौकातून सुरू होणारी दिंडी शहरातील प्रमुख मार्गांवरून नेण्यात येणार आहे. यात पालकमंत्री प्रकाश आबिटकर, सहपालकमंत्री माधुरी मिसाळ, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह जिल्ह्यातील खासदार, आमदार, इतर लोकप्रतिनिधी, विविध शैक्षणिक संस्थांचे विद्यार्थी आणि नागरिक सहभागी होणार आहेत.