

कोल्हापूर : शत-प्रतिशतसाठी भाजपने निकराचे प्रयत्न सुरू केले आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजप विभागवार मेळाव्यातून चाचपणी करत आहे. कार्यकर्त्यांना बळ देण्याची तयारी दाखविली जात आहे. यातूनच 2029 च्या विधानसभा निवडणुकीसाठी नवे चेहरे शोधलेे जात आहेत. विशेषत: थेट नगराध्यक्ष व जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती सभापतींच्या निवडीकडे काळजीपूर्वक लक्ष देण्याचे भाजप नियोजन करत आहे.
भाजपला मित्रपक्षांवर अवलंबून राहायचे नाही. आपला अजेंडा राबविण्यासाठी भाजपला शत- प्रतिशत सरकार हवे आहे. त्यासाठी पक्ष पातळीवर सूक्ष्म नियोजन सुरू आहे. भाजपच्या राज्य पातळीवरील नेत्यांना केंद्रीय पातळीवरून तसे मार्गदर्शन करण्यात आल्याचे समजते. भाजपचे सुरू असलेले विभागवार मेळावे, प्रदेशाध्यक्षांसह राज्यातील प्रमुख नेत्यांची उपस्थिती, त्यांच्याकडून होत असलेले मार्गदर्शन हे त्यातूनच सुरू झाले आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी विशेष कार्यकारी अधिकारीपदे विशेष अधिकारासह देण्याची घोषणा केली आहे. मात्र भाजपतही आता मूळ भाजप सोडून अन्य पक्षातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. त्यांचा त्यांच्या पक्षातल्या मूळ अनुभवावरून ते या सगळ्या घोषणांकडे पाहात आहेत. राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या काळात कार्यकर्त्यांना कोणतीही पदे मिळाली नाहीत. त्यापूर्वी राज्यातील महायुती सरकारच्या काळातही अनेक कार्यकर्त्यांना लवकर पदे मिळाली नाहीत. ज्यांना पदे मिळाली त्यांना ती पूर्ण कालावधीसाठी उपभोगता आली नाहीत. काहींना विधानसभा निवडणुकीपूर्वी निवड नियुक्तीची संबंधित खात्यांच्या मंत्र्यांची पत्रे मिळाली. मात्र त्यांना आपल्या नेमून दिलेल्या पदांची सूत्रे हाती घेण्यापूर्वीच राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे ताकही फुंकून प्यावे, अशी कार्यकर्त्यांची स्थिती आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वी महामंडळे व मंडळांवर कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या केल्या तर एक जागा व शेकडो इच्छुक अशी स्थिती आहे. एका कार्यकर्त्यांला संधी दिली तर शेकडो नाराज ही स्थिती टाळण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर महामंडळे व सरकारी समित्यावर निवड नियुक्त्या केल्या जाणार आहेत. त्यामुळेच सध्या विशेष कार्यकारी अधिकारी पदाची घोषणा नेत्यांकडून केली गेली आहे.भाजपने सगळे लक्ष स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केले आहे. गाव ते दिल्ली सगळी सत्ता शत-प्रतिशत भाजप ही त्यांची घोषणा आहे. महानगरपालिका क्षेत्रात चार नगरसेवकांचा एक प्रभाग यातून राजकीय ताकद असलेल्या कार्यकर्ते समजणार आहे; तर थेट नगराध्यक्ष निवड व पंचायत समिती सभापतींच्या माध्यमातून विधानसभेला नवे चेहरे समोर येणार आहेत. जिल्हा परिषदेच्या माध्यमातूनही नवे चेहरे समोर येणार असून नव्या चेहर्यांना संधी देण्याचा भाजपचा प्रयत्न बर्याच प्रमाणात यशस्वी झाल्याच्या पार्श्वभूमीवर शत- प्रतिशतसाठी भाजपने दमदार वाटचाल सुरू केली आहे.
जिल्हा परिषदा - 34
ग्रामपंचायती - 27 हजार 913
पंचायत समित्या - 351
नगरपालिका - 245
महापालिका - 29
नगरपंचायती - 146
कँटोन्मेंट बोर्ड - 07