Ichalkaranji Municipal Corporation | ‘स्थायी’ सभापतीसाठी इच्छुकांचे ‘लॉबिंग’
इचलकरंजी : महापालिकेच्या विविध पाच विषय समित्यांच्या सभापतिपदांच्या निवडीसाठी विशेष सभा सोमवार, 9 मार्च रोजी सकाळी 11 वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. या सभेच्या अध्यक्षस्थानी अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे असणार आहेत. महापालिकेसाठी महत्वाच्या समजल्या जाणार्या ‘स्थायी’ समितीवर वर्णी लागावी, यासाठी सदस्यांकडून जोरदार लॉबिंग सुरू आहे. त्यामुळे चुरस वाढली आहे.
महापालिकेत भाजप महायुतीकडे सत्तेच्या चाव्या आहेत. आता विषय समित्यांच्या सभापती निवडीकडे लक्ष लागले आहे. विशेषतः स्थायी समिती सभापतिपदावर कोणाची वर्णी लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या पदासाठी भाजपमधील आवाडे आणि हाळवणकर गटांत सध्या तीव— रस्सीखेच पाहायला मिळत आहे. दरम्यान, महिला व बालकल्याण समितीच्या सभापतिपदासाठीही अनेक इच्छुक नगरसेविका रिंगणात उतरल्याने या निवडीकडेही विशेष लक्ष असणार आहे. याशिवाय परिवहन, शिक्षण आणि मागासवर्गीय कल्याण समितीच्या सभापतिपदांच्या निवडीदेखील याच सभेत होणार आहेत; मात्र या समित्यांबाबत फारशी स्पर्धा नसून, पक्षनेत्यांचा निर्णय अंतिम ठरण्याची शक्यता आहे.
शक्यता अन् पेच...
पाच विषय समित्यांपैकी दोन समित्या हाळवणकर गटाकडे, तर तीन समित्या आवाडे गटाकडे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महापौरपद आवाडे गटाकडे गेल्याने स्थायी समितीचे सभापतिपद हाळवणकर गटाला मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती; मात्र आवाडे गटानेही या पदावर आपला दावा कायम ठेवल्याने राजकीय पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे 9 मार्चची सभा महापालिकेच्या पुढील राजकीय समीकरणांची दिशा ठरवणारी असणार आहे.

