

कोल्हापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी सोमवारी प्रसिद्ध झाली. तिसर्या यादीत जिल्ह्यातील जिल्हा व राष्ट्रीयीकृत बँक अशा मिळून एकूण १३४२ शेतकर्यांना कर्जमाफी मिळाली. आजअखेर ३२,१७२ शेतकर्यांना योजनेचा लाभ मिळाला आहे. पात्र लाभार्थ्यांना अधारप्रमाणिकरण पूर्ण करण्याचे आवाहन जिल्हा उपनिबंधक नीलकंठ करे यांनी केले आहे.
राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत पोर्टलवर कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक आणि जिल्ह्यातील अन्य राष्ट्रीयीकृत बँकांमधील थकबाकीदार ४१,५५२ शेतकर्यांची माहिती अपलोड केली होती. आजअखेर योजनेंतर्गत तीन याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत. पहिल्या यादीत २६,९९७, दुसर्या यादीत ३८३३ आणि तिसर्या यादीत १३४२ शेतकर्यांना कर्जमाफी मिळाली आहे. कर्जमाफीची रक्कम साधारणत: १२३ कोटी रुपयांहून अधिक आहे.
८३९५ शेतकर्यांचे प्रमाणिकरण प्रलंबित
शेतकरी कर्जमाफीच्या पहिल्या दोन यादीतील पात्र लाभार्थ्यांपैकी २४,५९९ शेतकर्यांनी आधार प्रमाणिकरण पूर्ण केले आहे. तर अद्याप ८३९५ शेतकर्यांचे आधार प्रमाणिकरण प्रलंबित आहे. तसेच सोमवारी प्रसिद्ध झालेल्या तिसर्या यादीतील १३४२ शेतकर्यांचेही प्रमाणिकरण करावे लागणारआहे. तसेच ॲग्रीस्टॅकची नोंदणी केली नसल्यास पात्र लाभार्थ्यांनी तत्काळ नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक करे यांनी केले आहे.