

सांगरूळ : बोलोली (ता. करवीर) येथे एस.टी. खाली सापडल्याने 11 वर्षांच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. पूर्वा बाळासो वाकरेकर असे तिचे नाव आहे. दुपारी सव्वा दोनच्या सुमारास ही घटना घडली. घटनेची नोंद करवीर पोलिसांत झाली आहे.
रंकाळा ते बोलोली ही एस.टी. (एमएच 06 एस 8204) बोलोली येथे प्रवासी सोडून परत रंकाळा स्टँडकडे जात होती. यावेळी विठ्ठल मंदिराच्या शेजारी बोळातून पूर्वा वाकरेकर ही मुलगी अचानक रस्त्यावर आली. त्यामुळे ती थेट एस.टी.च्या उजव्या बाजूला खाली सापडली. यावेळी एस.टी. खाली ती पंधरा ते वीस फूट फरफटत गेल्यामुळे ती गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी तातडीने कोल्हापुरात खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. तिच्या मागे आई-वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे.