

पेठवडगाव : येथील पन्हाळकर वसाहतीत बनावट मद्य निर्मिती सुरू असताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने धाड टाकली. यावेळी 6 लाख 97 हजार रुपये किमतीचा विनापरवाना व बनावट देशी-विदेशी मद्यसाठा जप्त केला. या प्रकरणी रणजित प्रकाश कांबळे (वय 40, रा. पन्हाळकर वसाहत, पेठ-वडगाव) याला अटक करण्यात आली.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकास पेठवडगाव येथे स्पिरिटद्वारे फ्लेव्हर्स वापरून वेगवेगळ्या कंपन्यांची बनावट दारू तयार करून ती वेगवेगळ्या कंपन्यांचे लेबल लावून विकली जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार भरारी पथकाने छापा टाकला.
या अवैध मद्यार्काचा पुरवठादार कोण आणि बनावट मद्याचा पुरवठा कुठे होणार होता, याबाबतचा तपास सुरू असल्याचे निरीक्षक सदानंद मस्करे यांनी सांगितले. मद्य साठा प्रकरणी रणजित कांबळे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.