

कोल्हापूर : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोवा बनावट दारूची तस्करी करणार्या वाहनांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने छापा टाकून दारूसाठा, वाहन असा 7 लाख 10 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी चंदगड येथील शिवाजी धाकलू गावडे (वय 43, रा. गावडे गल्ली, पार्ले) याला अटक करण्यात आली आहे.
गडहिंग्लज-आजरा रोडवर हिरलगे फाट्याजवळ शुक्रवारी रात्री उशिरा ही कारवाई केली. गोवा बनावटीच्या 750 मिली क्षमतेच्या 600 सिलबंद बाटल्या हस्तगत केल्या आहेत. असे अधीक्षक स्नेहलता नरवणे, उपअधीक्षक युवराज शिंदे यांनी सांगितले. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संशयित गावडे हा सहकार्यांसमवेत गोवा बनावट दारूची तस्करी करीत असल्याची माहिती भरारी पथकाला लागली. अधीक्षक स्नेहलता नरवणे, उपअधीक्षक युवराज शिंदे यांच्या सूचनेनुसार निरीक्षक प्रमोद खरात, संदीप जाधव, सत्यवान भगत यांच्या पथकाने हिरलगे फाट्याजवळ थांबलेल्या वाहनावर छापा टाकला. झडतीत गोवा बनावटीचा विदेशी दारूसाठा हस्तगत करण्यात आला आहे. बनावट दारूसाठा कोणासाठी व कोठून आणण्यात आला, याची संशयिताकडे चौकशी करण्यात येत असल्याचे पथकाने सांगितले.