

कोल्हापूर : मित्राकडे दारूसाठी पैसे का मागितलेस, असा जाब विचारणार्या तरुणावर सराईत गुन्हेगाराने धारदार कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. यामध्ये आकाश कृष्णा शिंदे (वय 25, रा. डवरी वसाहत, सायबर चौक, कोल्हापूर) हा गंभीर जखमी झाला आहे. हल्लेखोर अजय अनिल पाथरूट (रा. पाथरूट वसाहत, सायबर चौक) यास पोलिसांनी अटक केली आहे.
संशयित पाथरूट हा सराईत गुन्हेगार आहे. पोलिस दप्तरी त्याच्याविरुद्ध 14 गुन्ह्यांचे रेकॉर्ड असल्याचे राजारामपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक सतीश होडगर यांनी सांगितले. शुक्रवारी (दि.26) सायंकाळी दौलतनगर येथील हेरवाडे गिरणीजवळ हा प्रकार घडला. अजय पाथरूटने केलेल्या हल्ल्यात आकाश शिंदे गंभीर जखमी झाला आहे.
जखमी तरुण व संशयित एकाच गल्लीत राहणारे आहेत. आकाश शिंदे याच्या मित्राकडे संशयिताने दारूसाठी पैसे मागितले. त्याचा जाब शिंदे यानी पाथरूटला विचारला. त्यामुळे संतापलेल्या संशयिताने आकाश शिंदे यास शिवीगाळ करून कोयत्याने हल्ला केला. त्यात तरुण गंभीर जखमी झाला. पोलिसांनी हल्लेखोराला अटक केली. रविवारी त्यास न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.