District Bank Election | अवसायनातील दूध संस्‍थांचा जिल्‍हा बँकेतही संघर्ष

District Bank Election |
District Bank Election | अवसायनातील दूध संस्‍थांचा जिल्‍हा बँकेतही संघर्ष
Published on
Updated on

कोल्‍हापूर : अवसायनातील दूध संस्‍थांना गोकुळ पाठोपाठ आता कोल्‍हापूर जिल्‍हा मध्‍यवर्ती बँकेतही मताच्‍या अधिकारासाठी संघर्ष करावा लागणार आहे. बँकेच्‍या अवसायन यादीत या दूध संस्‍थांचा समावेश असल्‍याने त्‍यांचे ठराव अपात्र ठरणार आहेत. अवसायनातून संस्‍था बाहेर पडल्‍याचा दाखला संबंधित संस्‍थांनी दिला तरच त्‍यांचा यादीत समावेश केला जाणार आहे. त्‍यामुळे संस्‍थांवर अपात्रतेची टांगती तलवार असणार आहे.

गोकुळच्‍या निवडणुकीत जिल्‍ह्यातील १,३२० संस्‍थांवर आक्षेप घेण्‍यात आला होता. सहायक निबंधक कार्यालयात या संस्‍थांची सुनावणी घेऊन निकाल देण्‍यात आला. यामध्‍ये ६४४ संस्‍थांचा अवसायनाचा आदेश अंतिम करण्‍यात आला. यानंतर गेली चार महिने या संस्‍थांनी शासकीय, न्‍यायालयीन पातळीवर संघर्ष केला. न्‍यायालयाने या संस्‍थांचा अवसायनाचा आदेश रद्द केल्‍याने गोकुळच्‍या मतदार यादीत या संस्‍थांच्‍या समावेशाचा मार्ग मोकळा झाला आहे.

गोकुळमध्‍ये मताचा अधिकारी मिळण्‍यासाठी केलेल्‍या संघर्षाला यश मिळाल्‍यानंतर आता जिल्‍हा बँक निवडणुकीत या यामधील दूध संस्‍थांचा अवसायन यादीत समावेश असल्‍याने त्‍यांचे ठराव अपात्र ठरण्‍याची शक्‍यता आहे. ही बाब लक्षात आल्‍यानंतर गुरुवारी संस्‍था प्रतिनिधींनी सहायक निबंधक कार्यालयात अवसायन यादीबाबत जाब विचारला. त्‍यामुळे येथील वातावरण काही काळ तणावपूर्ण बनले होते.

८०४ संस्‍था अवसायनात

जिल्‍हा बँकेच्‍या १२,२४३ पात्र संस्‍थांपैकी ज्‍या संस्‍था अवसायनात आहेत, अशा संस्‍थांचे ठराव स्वीकारणार नसल्‍याचे विभागीय उपनिबंधक महेश कदम यांनी यापूर्वीच स्‍पष्‍ट केले आहे. बँकेच्‍या एकूण संस्‍थांपैकी ८०४ संस्था अवसायनात आहेत. यामध्‍ये बहुतांश प्राथमिक दूध संस्‍थाचा समावेश आहे. त्‍यामुळे गोकुळ पाठोपाठ जिल्‍हा बँक निवडणुकीत दूध संस्‍थांचा मुद्दा वादाचा ठरणार आहे.

प्राप्‍त ठरावांची पडताळणी सुरू

जिल्‍हा बँकेसाठी १०,१७९ संस्‍थांनी ठराव सादर केले आहेत. प्राप्‍त ठरावांच्‍या पडताळणीचे काम सुरू आहे. पडताळणीचे काम पूर्ण झाल्‍यानंतर बँकेची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news