

अनुराधा कदम
कोल्हापूर : सकाळी उठल्यावर भक्तिगीते, प्रवासात आवडीची गाणी, कामाच्या तणावात एखादी शांत धून किंवा रात्री झोपण्यापूर्वी मंद संगीत... आपण सर्वजण नकळत संगीताचा आधार घेत असतो. पण हेच संगीत डॉक्टरांच्या उपचारांचा भाग बनू शकते का? उत्तर आहे... होय.
काही वर्षांपूर्वीपर्यंत संगीत म्हणजे करमणूक, विरंगुळा किंवा छंद असे मानले जात होते; मात्र आता जगभरातील अनेक रुग्णालयांमध्ये संगीताचा वापर उपचारांचे पूरक साधन म्हणून केला जात आहे. कारण संगीत केवळ कानांपर्यंत पोहोचत नाही, तर ते थेट मेंदू, भावना आणि शरीराच्या जैविक प्रक्रियांवर परिणाम करते. तणावात असताना आवडते गाणे ऐकल्यावर मन हलके का वाटते? दुःखी असताना एखादी धून डोळ्यात पाणी का आणते? किंवा अनेक वर्षांनंतर ऐकलेले गाणे जुन्या आठवणी का जागवते? याचे उत्तर मेंदूच्या कार्यपद्धतीत दडलेले आहे. संगीत ऐकल्यावर मेंदूतील आनंद, प्रेरणा आणि स्मरणशक्तीशी संबंधित भाग सक्रिय होतात. त्यामुळे चिंता कमी होते आणि मनाला सकारात्मक ऊर्जा मिळते. विज्ञान आणि स्वर यांची सांगड घालत म्युझिक थेरपी आरोग्य क्षेत्रात नवा अध्याय लिहित आहे.
जागतिक संगीत दिनाची गोष्ट
१९८२ मध्ये फ्रान्समध्ये सुरू झालेल्या ‘फेट द ला म्युझिक’ या उपक्रमातून जागतिक संगीत दिनाची संकल्पना जन्माला आली. संगीत प्रत्येकापर्यंत पोहोचावे, कलाकारांना मुक्तपणे सादरीकरणाची संधी मिळावी आणि समाजात सांस्कृतिक संवाद वाढावा हा त्यामागचा उद्देश होता. २१ जून रोजी १२० हून अधिक देशांमध्ये हा दिवस साजरा केला जातो.
संगीतोपचार कोणासाठी?
विद्यार्थ्यांसाठी-एकाग्रता वाढविण्यासाठी
नोकरदारांसाठी-तणाव कमी करण्यासाठी
ज्येष्ठ नागरिकांसाठी - स्मरणशक्ती जागृत ठेवण्यासाठी
रुग्णांसाठी-वेदना आणि भीती कमी करण्यासाठी
निद्रानाश असलेल्यांसाठी-चांगल्या झोपेसाठी
कोणत्या व्याधींमध्ये उपयोग?
नैराश्य, निद्रानाश
कर्करोग उपचारांतील मानसिक ताण
शस्त्रक्रियेनंतरची अस्वस्थता
अल्झायमर आणि डिमेन्शिया
उच्च रक्तदाबाशी संबंधित तणाव