

कसबा बावडा : कोल्हापूरचा स्वाभिमान, अभिमान व प्रेरणास्थान असलेल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांची व कामांची प्रेरणा घेऊन कोल्हापूरचे नाव अधिक उज्ज्वल करूया, असे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले. लक्ष्मी विलास पॅलेस या लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जन्मस्थळी 151 व्या जयंतीनिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते.
मंत्री आबिटकर म्हणाले, देशाला दिशा देणारे काम शाहू महाराजांनी केले असून, त्यांच्या जन्मस्थळाबाबत अजून जे जे आवश्यक आहे, ते करण्यासाठी सर्व मिळून कर्तव्याची व भूमिकेची जबाबदारी घेऊन करू. या ठिकाणच्या विकासासाठी तत्कालीन पालकमंत्री सतेज पाटील आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनीही योगदान दिले आहे. यापुढेही आम्ही सर्वजण मिळून जन्मस्थळ विकासासाठी कार्य करू. येत्या काळात अधिवेशन झाल्यावर एक बैठक घेऊन सर्व संघटना, समित्यांच्या सूचना व त्यांचे म्हणणे विचारात घेऊन पुढील कामांची दिशा ठरवली जाईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
यावेळी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची रयतेसाठी स्वतःची झोळी रिकामी करणारा राजा म्हणून ओळख आहे. शाहू महाराजांनी जनतेसाठी झोकून काम केले, म्हणूनच आपण आजही छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर छत्रपती शाहू महाराज यांची पालखी वाहतो. खासदार शाहू महाराज यांनी शाहू जन्मस्थळ परिसरात सुरू असलेल्या कामाबाबत समाधान व्यक्त केले. जन्मस्थळ व परिसरातील कामे चांगल्या प्रकारे सुरू आहेत, कामांना अजून गती यावी. सर्वांनी एकत्रित येत चांगले काम करूया.
वसंतराव मुळीक यांनी जन्मस्थळात लगतची कृषी विद्यापीठाकडे असलेली जमीन जन्मस्थळ विकासामध्ये लवकरात लवकर समाविष्ट करावी, अशी मागणी केली. जन्मस्थळाचे उर्वरित कामही लवकरात लवकर पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. शालेय विद्यार्थ्यांनी कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमुख पाहुण्यांना पुष्प देऊन स्वागत केले. प्रारंभी पालकमंत्री आबिटकर, मंत्री मुश्रीफ, खा. शाहू महाराज छत्रपती यांच्यासह आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
यावेळी आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार ऋतुराज पाटील, जिल्हाधिकारी अमोल येडगे, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, महापालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., जिल्हा पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ जयसिंगराव पवार, इंद्रजित सावंत, श्रीराम सेवा संस्था सभापती संतोष पाटील, उपसभापती अनंत पाटील यांच्यासह मान्यवर शाहू प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शाहू जन्मस्थळातील एका इमारतीमध्ये होलोग्राफिक शो व डॉक्युमेंटरी साठी छोटे थिएटर उभारण्यात आले आहे. शाहू जयंतीचे औचित्य साधून या विभागात मान्यवरांच्या उपस्थितीत होलोग्राफिक शो बरोबरच डॉक्युमेंटरी दाखवण्याचे नियोजन करण्यात आले होते. यामध्ये कोणत्याही शासकीय पदावर नसणार्या कृष्णराज महाडिक यांच्यासाठी बैठक व्यवस्था आरक्षित ठेवल्यामुळे राजकीय आरोप करण्यात आले. कृष्णराज यांच्यासाठी आसन कोणत्या कारणाने आरक्षित ठेवले, याबाबत मात्र पुरातत्त्व विभागाचे अधिकारी उत्तर देऊ शकले नाहीत. बैठक व्यवस्था आरक्षित होती, पण कृष्णराज महाडिक मात्र या ठिकाणी फिरकलेच नाहीत.