

सुनील कांबळे
नागाव: निसर्गाचा नियम आहे 'बळी तो कान पिळी'. जंगलात शिकारी आणि शिकार यांच्यातील संघर्ष आपण नेहमीच पाहतो. मात्र, करवीर तालुक्यातील जठारवाडी येथील जंगलात निसर्गाच्या या क्रूर नियमाला छेद देणारी एक हृदयस्पर्शी घटना घडली आहे. एका भुकेल्या बिबट्याने वानर मादीची शिकार केली, पण तिच्या सोबत असलेल्या पिल्लाला पाहून बिबट्यातील 'आई' जागी झाली आणि त्याने आपली शिकार सोडून पिल्लाला जीवदान दिले.
शिये (ता. करवीर) परिसरातील जंगलात अन्नाच्या शोधात असलेल्या एका बिबट्याने वानरांच्या कळपावर हल्ला केला. या हल्ल्यात त्याने एका वानर मादीची शिकार केली. बिबट्या आपली शिकार खाणार इतक्यात, मृत मादीला बिलगून असलेल्या लहान पिल्लाकडे त्याचे लक्ष गेले. ज्या बिबट्याने काही क्षणांपूर्वी आईचा जीव घेतला होता, तोच बिबट्या त्या अनाथ पिल्लाला पाहून थबकला.
अँनिमल प्लँनेटवर दाखवल्या जाणाऱ्या दुर्मिळ दृश्यांचा प्रत्यय प्रत्यक्ष शियेच्या जंगलात आला. शिकारीची भूक विसरून बिबट्याने त्या पिल्लाला कोणतीही इजा केली नाही. इतकेच नव्हे, तर पिल्लाप्रती निर्माण झालेल्या करुणेपोटी तो आपली शिकार तिथेच सोडून जंगलात निघून गेला.
वनविभागाची तत्परता
या घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या पथक नंदकुमार नलवडे, वनक्षेत्रपाल करवीर , सागर कोळी , वनपाल करवीर, विकास घोलप ,वनरक्षक शिये ,प्रदिप सुतार वन रेस्कू टीम प्रमुख यानी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मादीचा मृतदेह ताब्यात घेतानाच, ते अनाथ पिल्लू सुरक्षित असल्याचे पाहून वन कर्मचारीही भारावून गेले. आई गमावलेल्या या पिल्लाला आता मानवी मायेची गरज असल्याने वनविभागाने मोठे पाऊल उचलले आहे.
निसर्गाचे अनोखे दर्शन
बिबट्यासारखा हिंस्त्र प्राणी जेव्हा एका लहान जीवासाठी आपली शिकार त्यागतो, तेव्हा 'मातृत्व' हे केवळ माणसापुरते मर्यादित नसून ते सृष्टीच्या कणाकणात आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. सध्या या घटनेची चर्चा संपूर्ण परिसरात होत असून बिबट्याची ही 'माणुसकी' (प्राणीधर्म) सर्वांचे डोळे ओलावणारी ठरली आहे.
"प्राण्यांमध्येही संवेदना असतात, याचे हे उत्तम उदाहरण आहे. आम्ही त्या वानर पिल्लाला आमच्या ताब्यात घेतले असून, त्याचे शास्त्रोक्त पद्धतीने पालनपोषण आणि संगोपन करण्याचा निर्णय घेतला आहे. पिल्लू पूर्णपणे स्वावलंबी होईपर्यंत त्याची विशेष काळजी घेतली जाईल. व त्यानंतर त्याला जंगलात सोडण्यात येईल.
— प्रदीप सुतार.. वन रेस्कू टीम प्रमुख वनविभाग कोल्हापूर