

बांबवडे : शाहूवाडी तालुक्यातील शित्तूर–वारुण पैकी ढवळेवाडी येथे मानवी वस्तीत बिबट्याचा मुक्त संचार सुरू असून, त्यामुळे विद्यार्थ्यांसह शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे नागरिकांनी वनविभागाकडे तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. मात्र, वनविभागाकडून याकडे अपेक्षित गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
शाहूवाडी तालुक्याच्या उत्तरेकडील आणि चांदोली राष्ट्रीय उद्यानालगत असलेल्या गावांना उद्यानातील हिंस्त्र प्राण्यांचा उपद्रव कायमच भोगावा लागत आहे. त्यातच गेल्या दोन दिवसांपासून ढवळेवाडी परिसरात बिबट्याने ठाण मांडल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.
याच परिसरात गेल्या दोन वर्षांत धनगर समाजातील दोन शाळकरी चिमुकल्या मुलींचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. तसेच शेतकऱ्यांच्या असंख्य शेळ्या, मेंढ्या, गाई, म्हशी व पाळीव कुत्र्यांवरही बिबट्याने हल्ले केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. अशा भीतीदायक पार्श्वभूमीवरही संबंधित विभागाकडून ठोस व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत, अशी नाराजी ग्रामस्थांमध्ये आहे.
दरम्यान, पर्यटन वाढीसाठी वनविभागाने पट्टेरी वाघ सोडण्याचा निर्णय घेतल्याने स्थानिकांच्या जीविताचा प्रश्न अधिकच गंभीर झाला आहे. यासंदर्भात शाहूवाडी वनविभागाचे वनपाल सदानंद जगताप यांच्याशी संपर्क साधला असता, संबंधित बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी रेस्क्यू टीम पाठवली जाईल, असे त्यांनी सांगितले. मात्र लोकप्रतिनिधी, वनविभाग, शासन व प्रशासन यापैकी कोणीही या समस्येकडे गांभीर्याने पाहत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.