

प्रकाश मोहरेकर
वारणानगर : शिकारीच्या शोधात विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या दोन पिलांना वन विभागाच्या कर्मचार्यांनी तब्बल दोन तास धाडसी आणि थरारक प्रयत्न करून सुखरूप बाहेर काढले. पन्हाळा तालुक्यातील जाखले येथे हा प्रकार घडला.
शुक्रवारी सायंकाळी जाखले येथील जामदार मळ्यातील सा. रा. पाटील यांच्या विहिरीजवळ शेतात शारदा पाटील या काम करत होत्या. यावेळी विहिरीतून विचित्र आवाज ऐकू आल्याने त्यांनी विहिरीजवळ जाऊन पाहिले असता बिबट्याची दोन पिले दगडी कठड्यावर बसलेली दिसली. याबाबत त्यांनी कुटुंबीयांना माहिती दिली. कुटुंबीयांनी पोलिस पाटील अजित पाटील यांच्या मदतीने वन विभागाला माहिती कळविली. वनरक्षक योगेश पाटील हे प्रथम घटनास्थळी दाखल झाले. बिबट्याची पिले विहिरीत पडल्याची बातमी गावात पसरताच नागरिकांची विहिरीवर मोठी गर्दी झाली होती. वन विभागाच्या रेस्क्यू टीमला पाचारण केले होते.
सांयकाळी साडेसहा वाजण्याच्या रेस्क्यू टीम दाखल झाली. त्यावेळी दोन्ही पिल्ले भेदरून शांत बसली होती. कर्मचार्यांनी पिल्लांना पकडण्यासाठी दोरीच्या सहाय्याने सापळा विहिरीत सोडला. त्यामध्ये जाण्यास बिबटे तयार नव्हते. उशिरापर्यंत पिल्लांना सापळ्याच्या साह्याने पकडण्याचे प्रयत्न सुरू होते. त्यावेळी विहीरीच्या काठावर नागरीकांची मोठी गर्दी असल्यामुळे पिल्लाना पकडताना अडथळा निर्माण होत होता. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास दोघांना प्रथम जाळीत पकडण्यात आले त्यानंतर विहीरीत पून्हा लोखंडी सापळा सोडून त्यामध्ये जाळी सोडून सापळा वरती घेत लोखंडी दरवाजा लॉक केला आणि विजेच्या चपळाईने वाहनात सापळा चढवून वनविभागाची गाडी शिवारातून सायरन वाजवत गेली.
कोल्हापूरचे उपवनसंरक्षक धैर्यशील पाटीलयांच्या मार्गदर्शनाखाली पन्हाळा परिक्षेत्र अधिकारी अजित माळी,वनपाल सागर पटकरे,राक्षीचे वनरक्षक योगेश पाटील, प्रदीप सुतार, संतोष बिरंबोळे, रेस्क्यू टीम पन्हाळा व कोल्हापूर यांच्या पथकाने व जाखले सरपंच महादेव देशमुख, सागर माने, अजित पाटील, सचिन पाटील, राजेंद्र पाटील, प्रकाश करंबळे, दिलीप करंबळे यांनी ही मोहिम फत्ते केली.
सावधगिरी बाळगा!
9 ते 10 महिन्यांची बिबट्याची पिले असून शिकारीच्या शोधात झुडपाने वेढलेल्या विहिरीत ती पडली होती. माहिती समजल्यावर आम्ही तत्काळ पोहोचलो. याची आई याच परिसरात वावरत असल्याने सावधगिरी बाळगावी, असे आवाहन राक्षीचे वनरक्षक योगेश पाटील यांनी केले आहे.