

Radhanagari leopard attack five goats killed
राधानगरी : तालुक्यातील पाटपन्हाळा गावात बिबट्याने पाच शेळ्यांवर हल्ला करून त्यांचा फडशा पाडल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
वनविभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाटपन्हाळा येथील शेतकरी शिवाजी बाबू बोडके यांच्या पाच शेळ्या मागील आठवड्यात अचानक बेपत्ता झाल्या होत्या. त्यांनी याबाबत वनविभागाकडे तक्रार दाखल केली होती. काही दिवसांनी गावातील भोसले यांच्या शेतात तीन शेळ्या अर्धवट खाल्लेल्या आणि कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्या. घटनास्थळी बिबट्या आणि त्याच्या बछड्यांचे पायाचे ठसेही आढळले.
वनविभागाने झालेल्या घटनेचा पंचनामा करून नुकसानीचे प्रकरण वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवले आहे. या घटनेमुळे परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. वारंवार होणाऱ्या बिबट्याच्या हल्ल्यांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
घटनास्थळी वनपाल एस. एस. कांबळे, वनरक्षक भाग्यश्री कुंभार आणि वनमजूर यांनी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे आणि शक्यतो जनावरांना बंदिस्त ठिकाणी ठेवण्याचे आवाहन वनक्षेत्रपाल पल्लवी चव्हाण यांनी केले आहे.