बिबट्याची दहशत ! कडवेत भरवस्तीत पाळीव कुत्र्याचा फडशा

Leopard attack | कडवे पैकी पाटीलवाडीत येथील घटना; ग्रामस्थांमध्ये भीतीचे सावट
बिबट्याची दहशत ! कडवेत भरवस्तीत पाळीव कुत्र्याचा फडशा
Published on
Updated on

विशाळगड : शाहुवाडी तालुक्यात मानव-वन्यजीव संघर्ष शिगेला पोहोचला असून तालुक्यातील कडवे पैकी पाटील वाडीत मध्यरात्रीच्या सुमारास एका बिबट्याने मानवी वस्तीत शिरकाव करून विशाल जयसिंग पाटील यांच्या पाळीव कुत्र्याला लक्ष करत जागीच ठार केले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास जेव्हा संपूर्ण गाव साखरझोपेत होते. तेव्हा बिबट्याने भक्ष्याच्या शोधार्थ विशाल पाटील यांच्या घराच्या अंगणात प्रवेश केला. तेथे बांधलेल्या पाळीव कुत्र्यावर बिबट्याने अचानक झडप घातली. कुत्र्याने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, मात्र बिबट्याचा हल्ला इतका भीषण होता की, कुत्र्याचा जागीच मृत्यू झाला. काही वेळाने हालचाल जाणवल्याने घरमालक जागे झाले, मात्र तोपर्यंत बिबट्या पसार झाला होता. विशाल पाटील यांनी चार महिन्यांपूर्वी हा कुत्रा विकत आणला होता.

बिबट्याने थेट मानवी वस्तीत शिरकाव केल्यामुळे ग्रामस्थांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. "जर बिबट्या घराच्या उंबरठ्यापर्यंत येत असेल, तर लहान मुले आणि वृद्ध सुरक्षित आहेत का?" असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. वन विभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

या घटनेनंतर वन विभागाने नागरिकांना रात्रीच्या वेळी घराबाहेर पडताना सावधगिरी बाळगण्याचे आणि घराबाहेर पुरेसा प्रकाश ठेवण्याचे आवाहन केले आहे. आता वन विभाग या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी काय पावले उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

​"वन विभागाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन परिसरात गस्त वाढवावी आणि नरभक्षक प्रवृत्तीकडे झुकणाऱ्या या बिबट्याला जेरबंद करावे”

— विशाल पाटील, स्थानिक ग्रामस्थ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news