

शिरढोणः शिरढोण येथे इचलकरंजी कृष्णा नळ पाणी योजनेच्या गळती काढलेल्या पाईपलाईनला १२ तासांत पुन्हा त्याचठिकाणी गळती लागल्याने ऐन सणासुदीत पाण्याचा ठणठणाट निर्माण झाला आहे. दरम्यान चार महिन्यांपूर्वी शिरढोण पेयजल योजनेच्या पाईपलाईनची बस्तवाड(ता.शिरोळ)या ठिकाणी पालिका पाणीपुरवठा विभागाकडून खुदाई करतेवेळी तोडफोड झाली असल्याने शिरढोण येथील पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. त्यामुळे इचलकरंजी नगरपालिका पाणीपुरवठा विभागाच्या गलथान कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे.
आठ दिवसांपूर्वी येथील बाणदार शाळेजवळ कृष्णा जलवाहिनीला मोठ्या प्रमाणात गळती लागली होती. त्यामुळे गळती काढण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात आले. मात्र निकृष्ठ कामामुळे १२तासांतच पुन्हा त्याच ठिकाणी गळती लागल्याने पाणीपुरवठा बंद करण्यात आला. त्यामुळे गळती काढण्यासाठी विभागाचे अधिकारी व कर्मचारी पळापळ करत आहेत. वारंवार गळती लागून येथील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. मात्र एका दमडीचीही मदत मिळत नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. गळतीचा प्रकार वारंवार होत असल्याने गळतीचे ग्रहण सुटेना इचलकरंजीकरांचा वनवास संपेना अशा उद्विग्न प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. या कृष्णा योजनेच्या पाईपलाईनला वर्षभरात अनेक वेळा गळती लागली आहे. वारंवार गळती लागत असल्याने शिरढोण, टाकवडे गावातील लोकांची डोकेदुखी बनली आहे.
काही लोकांच्या राहत्या घरासमोरच गळती लागली आहे.त्यामुळे त्याच्या घराच्या भिंती ओलावल्या आहेत. परिणाम त्या घरांना धोका निर्माण झाला आहे. एकदा गळती काढूनही पुन्हा याठिकाणी गळती लागल्याने अनेकांना नाहक त्रास सामोरे जावे लागत आहे. हजारो लिटर पाणी वाया जात असून लाखोंचा खर्चही पाण्यात जात असल्यामुळे इचलकरंजी नगरपालिका प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून ही गळती काढावी अशी मागणी होत आहे. ऐन सणासुदीत लोकांना पाण्यासाठी शिमगा करावा लागत असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. वारंवार गळती लागत असल्याने शिरढोणची पाणी योजना असून अडचण नसून खोळंबा बनली आहे.
शिरढोण येथील पेयजल योजनेची पाईपलाईन मजरेवाडी, बस्तवाड मार्गावर कृष्णा जलवाहिनीसाठी खुदाई करतेवेळी तोडली आहे. दरम्यान पालिकेने एक महिन्याच्या आत तुटलेली पाईप बसवून देतो असे लेखी दिले आहे. मात्र चार महिने झाले तरी अद्याप शिरढोण योजनेच्या पाईपलाईनची नुकसान भरपाई दिली नाही. त्यामुळे शिरढोनमध्येही चार दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प आहे.