

कोल्हापूर : शाहू स्मारक भवन येथे कॅराओके गीतांची मैफल सुरू असतानाच ॲड. विजय ज्ञानदेव लांबोरे (वय ६१) यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. आवाजाच्या तीव्रतेनेच त्यांना हृदयविकाराचा धक्का आल्याची चर्चा उपस्थितांमध्ये होती. शुक्रवारी रात्री ही घटना घडली. त्यांना तत्काळ सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
ॲड. विजय लांबोरे हे शुक्रवारी शाहू स्मारक भवन येथे कराओके गीतांची मैफल एैकण्यासाठी गेले होते. रात्री ११ वाजण्याच्या सुमारास त्यांना अत्यवस्थ वाटू लागले. काही वेळातच ते बसलेल्या खुर्चीतच निपचीत पडले. त्यांच्या मित्रपरिवाराने त्यांना सीपीआर रुग्णालयात दाखल केले; मात्र तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. शहरातील विविध सांस्कृतिक उपक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग असायचा. त्यामुळे मैफल सुरू असतानाच हा प्रकार घडल्याने हळहळ व्यक्त झाली. ॲड. लांबोरे यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता.१) आहे.
आवाजाच्या तीव्रतेने झटका?
ॲड. विजय लांबोरे यांना यापूर्वी दोनवेळा हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांना आवाजाच्या तीव्रतेनेच तिसरा झटका आल्याचे प्रेक्षकांमधून सांगण्यात आले. या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली.