

कोल्हापूर : करवीर प्रांताधिकारी यांच्या नावे 25 हजारांची लाच घेताना खासगी वकिलाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली. विनायक सुरेश तेजम (वय 37, रा. फ्लॅट नं. ए-9, मंजुळा अपार्टमेंट, केडीसीसी बँकेसमोर, शाहूपुरी, कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे. कोल्हापूर शहरात एस.टी. स्टँड परिसरातील महालक्ष्मी चेंबर्स येथे तेजम याच्या कार्यालयातच कारवाई झाली. घटनेमुळे वकीलवर्गात आणि महसूल खात्यात मोठी खळबळ उडाली आहे.
तक्रारदार यांचे कोल्हापूर येथील मिळकतीवरील ‘ब’ सत्ता प्रकार कमी करण्यासाठीचे प्रकरण प्रांत कार्यालय, करवीर येथे दाखल होते. त्या प्रकरणावर प्रांत कार्यालय करवीर येथून आदेश काढून देण्यासाठी खासगी वकील तेजम याने तक्रारदार यांच्याकडून यापूर्वी 1 लाख 65 हजार रुपये घेतले होते. त्यानंतर तक्रारदार यांचे मूळ आदेश काढून देण्यासाठी प्रांत कार्यालयात आणखी 1 लाख रुपये द्यावे लागतील, अशी लाचेची मागणी तेजम याने केली. त्यानंतर तक्रारदार तेजम याला टाळू लागले. अखेर 25 हजार रुपयांवर तडजोड झाली. त्यानंतर तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी अर्जाची पडताळणी केली असता, तक्रारदार यांच्याकडून ‘ब’ सत्ता प्रकार कमी करण्यासाठी तेजम याने 1 लाख 65 हजार रुपये घेतल्याला दुजोरा मिळाला. तक्रारदार यांच्याकडे मिळकत प्रकरणाचा आदेश प्रांत कार्यालय, करवीर यांच्याकडून प्राप्त करून घेतला. त्यासाठी करवीर प्रांताधिकारी यांच्या नावे आणखी 25 हजार रुपये द्यावे लागतील, असे म्हणून तक्रारदारांकडे वकील तेजम याने लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी महालक्ष्मी चेंबर्स येथे सापळा लावून कारवाई केली. वकील तेजम याच्यावर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.